मतदान यंत्र तपासणीकडे राजकीय पक्षांची पाठ

मतदान यंत्र तपासणीकडे राजकीय पक्षांची पाठ

प्रातिनिधिक छायाचित्र

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ‘ईव्हीएम’विषयी शंका उपस्थित करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली. राज्यभरात विविध पक्षांकडून आंदोलने करण्यात आली. मात्र, ‘ईव्हीएम’विषयी शंका उपस्थित करणार्‍या राजकीय पक्षांनी मात्र प्रशासनाच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद देत मतदान यंत्र तपासणीकडे पाठच फिरवल्याचे दिसून येते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला असून अंबड येथील धान्य महामंडळाच्या गुदामात मतदान यंत्राची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्रांची अंबड येथील धान्य महामंडळाच्या गुदामात तपासणी सुरू करण्यात आली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार मतदान यंत्रांची तपासणी करताना तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रे केंद्रावर आणल्यानंतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसमक्ष त्यांची चाचणी करण्यात येऊन नंतरच ती वापरात आणावी. या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने सर्व राजकीय पक्षांना पत्र देत मतदान यंत्र तपासणीकरता उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मात्र, सत्ताधारी पक्ष वगळता इतर पक्षांनी याला फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येते.

लोकसभा निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’मध्ये सेटींग झाल्याचा आरोप करत सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला. भाजपने यंदाही विधानसभा निवडणुकीत अब की बार २२० पार चा नारा दिल्याने विरोधकांकडून टीका झाली. अगोदरच जागा किती येणार याबाबत माहिती असेल तर, मग निवडणुका तरी कशा करता घ्यायच्या, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र, आयोग कोणत्याही परिस्थितीत ‘ईव्हीएम’वरच मतदान घेण्यावर ठाम आहे. जिल्हा प्रशासनानेही याबाबत राजकीय पक्षांकडून कोणत्याही तक्रारी येऊ नयेत, याकरता सर्व पक्षांना मतदान यंत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे अधिकृतरित्या कळवण्यात आले आहे. मात्र, सत्ताधारी वगळता विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवल्याने राजकीय पक्षांची उदासीनताच यातून समोर आली.

लोकसभेची यंत्रेही वापरणार

नाशिक विधानसभा निवडणुकीसाठी २० हजार ९४६ मतदान यंत्रे प्राप्त झाली असून यापैकी १० हजार ८८ मतदान यंत्राची पडताळणी पूर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्रेही विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याने ज्या गुदामात हे मशीन ठेवण्यात आले आहे ते गुदाम जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन हे मतदान यंत्र ताब्यात घेण्यात आली. या मशीनमधील माहिती काढून टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.

First Published on: August 19, 2019 11:26 PM
Exit mobile version