ऐन परीक्षाकाळात विजेचा लपंडाव; परीक्षार्थींना घाम

ऐन परीक्षाकाळात विजेचा लपंडाव; परीक्षार्थींना घाम

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा ऑनलाईन सुरु असताना वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने विद्यार्थ्यांना ऐन उन्हाळ्यात चांगलाच घाम फुटला आहे. विद्यापीठ परीक्षा कालावधीत वीज पुरवठा खंडीत झालेला कालावधी गृहित धरत नसल्याने परीक्षार्थींचे नुकसान होत असल्याचे दिसून येते.कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाचे महत्व वाढले. तसेच परीक्षाही ऑनलाईन पध्दतीनेच पार पडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी अजूनही अभियांत्रिकीच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीनेच सुरु आहेत.

परीक्षार्थी लॅपटॉपद्वारे परीक्षा देत आहेत. तर काही विद्यार्थी हे मोबाईलद्वारे परीक्षेला सामोरे जात आहेत. ग्रामीण भागासह शहरातील वीज पुरवठा तासन तास खंडीत झाल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसतोय. कारण परीक्षेचा कालावधी ठरलेला असल्यामुळे त्या काळात परीक्षार्थी ऑफलाईन गेल्यास त्याला वाढीव वेळ दिला जात नाही. परिणामी जेवढा पेपर त्याने सोडवला आहे, तेवढेच गुण त्याला दिले जातात. वाढीव वेळ देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे. मात्र, विद्यापीठ त्याला मान्यता देत नसल्याचे दिसून येते.

एकतर विद्यार्थी खरच ऑफलाईन होता का? याची खात्री केली पाहिजे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास विद्यार्थ्यांचा त्यात कुठलाही दोष नसताना विद्यापीठ महावितरण कंपनीची शिक्षा विद्यार्थ्यांना देत असल्याचे पालकांनी म्हटले आहे.
महत्वाच्या परीक्षांना अडचण

अभियांत्रिकीसह सध्या इयत्ता बारावी व दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच लेखी स्वरुपात होत असल्या तरी बहुतांश विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करतात. एकतर दुपारी फार उकाडा जाणवत असल्याने घरात एसी, फॅन लावून अभ्यास करतात. दुपारच्या वेळी वीज पुरवठा तासन तास बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचा महत्वाचा वेळ वाया जातो. तसेच रात्रीच्या सुमारास असाच प्रकार घडत असल्याचे ग्रामीण भागातील विद्यार्थी सांगतात.

‘लोड शेडींग’मुळे दहा ते बारा तास विज पुरवठा बंद असतो. त्याचाही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे दिसून येते. परिणामी, बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहराकडे येत असल्याचे दिसून येते. तसेच महाविद्यालयांमध्येही प्रवेशासाठी कल वाढला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी व परीक्षार्थींच्या अडचणी

First Published on: March 28, 2022 9:35 AM
Exit mobile version