खड्डे बनले यमसदनीचा रस्ता; प्रहारचे रास्ता रोको आंदोलन

खड्डे बनले यमसदनीचा रस्ता; प्रहारचे रास्ता रोको आंदोलन

prahar aandolan

तुषार रौंदळ : विरगाव

विंचूर-प्रकाशा महामार्गावरील खड्ड्यांमुळे शनिवारी (दि.१२) औंदाणे गावाजवळ अपघात घडून दोघांचा बळी गेल्याने बागलाण तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आक्रमक शेतकर्‍यांनी रविवारी (दि.१३) सकाळी दहा वाजता विंचूर-प्रकाशा महामार्गावरील तरसाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, या खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना अनेक वाहनधारकांचा अपघात होऊन अनेकांना जीवानिशी मुकावे लागले आहे. तर अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. महामार्गावरुन हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. पावसामुळे महामार्गावरील खड्डे वाढले असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

महामार्गावरील खड्ड्यांजवळ व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी अनोखे ‘रस्ता यमनगरीचा…’ आणि ‘हा खड्डा माझेच काम करतो’ असे यमराजाच्या नावाने व्यंगचित्र काढून पडलेल्या खड्ड्याचे विदारक रुप दाखवले आहे. तर तालुका अध्यक्ष तुषार खैरनार यांनी रोजच अपघातांचे सत्र सुरू असून, रस्त्यावर पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. अशा गंभीर स्थितीतही संबंधित अधिकारी झोपले आहेत का, असा संतप्त सवाल केला आहे.

 

आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी आंदोलनस्थळी दाखल होत बंदोबस्त तैनात केला. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर रौंदळ, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कपिल सोनवणे, दिव्यांग प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष नाना कुमावत, शहराध्यक्ष रुपेश सोनवणे, व्यंगचित्रकार किरण मोरे, केतन निकम, बापू रौंदळ, बबन रौंदळ, तुळशीराम रौंदळ, स्वप्निल रौंदळ, कृष्णा जगताप, मुकेश रौंदळ, तुषार रौंदळ, वसंतराव भामरे आदिंनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

First Published on: September 14, 2020 7:26 PM
Exit mobile version