खाजगी सावकार आता सहकार विभागाच्या रडारवर; राजकीय पदाधिकार्‍याच्या कार्यालयावर छापा

खाजगी सावकार आता सहकार विभागाच्या रडारवर; राजकीय पदाधिकार्‍याच्या कार्यालयावर छापा

नाशिक : खासगी सावकार्‍यांच्या जाचाला कंटाळून शिरोडे कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्यानंतर सहकार विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. सहकार विभागाने जिल्ह्यात तक्रारी असलेल्या विविध ठिकाणांवर छापेमारी सुरू केली असून, मंगळवारी (दि. ३१) सातपूरमधील महादेववाडी परिसरात शिवसेना पदाधिकार्‍याच्या कार्यालयावर छापा मारून पथकाने संशयितांची ४ तास चौकशी केली. शिवाय, संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. ही कारवाई नाशिक तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने केली.

अशोकनगर परिसरातील शिरोडे कुटुंबातील दोन पुत्रांसह पित्याने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस प्रशासनाने नागरिकांना खासगी सावकारांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली होती. सावकारी व्यवसायात गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने त्यांच्या बाबत तक्रार करण्यास नागरिक धजावत नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेत सावकारांचा जाच सुरू असलेला नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार नागरिकांच्या तक्रारी पोलीस व सहकार विभागाकडे प्राप्त होत आहेत.

सातपूरमधील शिवसेनेचे पदाधिकारी व त्यांच्या बंधू विरोधात अवैध सावकारी केल्याची तक्रार सहकार विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार तालुका उपनिबंधक कार्यालयातील तालुका निबंधक फैयाज मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी गांगुर्डेंच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी आढळून आलेली संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. याबाबतचा पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये तथ्य आढळून आल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात अवैध सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

First Published on: February 1, 2023 12:52 PM
Exit mobile version