मोकाट जनावरांचा लवकरच बंदोबस्त

मोकाट जनावरांचा लवकरच बंदोबस्त

मोकाट जनावरे पकडण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदांना अखेर ठेकेदारांनी प्रतिसाद दिल्याने, शहरातील ऐरणीवर आलेली ही समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. सिडकोत मोकाट जनावरांच्या हल्ल्यात बालकासह एका वृद्धा जखमी झाल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त झाला होता.

शहरातील मुख्य मार्गांसह विविध चौकांमध्ये मोकाट जनावरांचा ठिय्या आणि त्यांच्यामुळे अनेकदा अपघात होऊनही महापालिकेच्या स्तरावरुन बंदोबस्तासाठी कोणतिही हालचाल होत नव्हती. सिडकोतील घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरे पकडण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र, त्यांना प्रतिसादच मिळत नव्हता. अखेर स्वतःहून संपर्क साधल्यानंतर ठेकेदारांचा प्रतिसाद लाभला. कारवाईदरम्यान ठेकेदारांना जनावरांच्या डॉक्टरांचीही व्यवस्था करणे बंधनकारक असेल. त्यामुळे एखाद्या भागात मोकाट जनावर जखमी अवस्थेत आढळले तरीही, त्याला ताब्यात घेऊन उपचारांची जबाबदारी ठेकेदाराची राहणार आहे. ठेकेदार निश्चितीनंतर नाशिककरांची मोकाट जनावरांच्या समस्येतून मुक्तता होणार आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे गाई-गुरे पकडण्यासाठी स्वतःचे तांत्रिक मनुष्यबळ नाही. त्यामुळे खासगी संस्थेमार्फत हे काम करावे लागते.

फौजदारी गुन्हा दाखल होणार

जनावरांना रस्त्यांवर सोडून देणाऱ्या गोठेमालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अनेकदा गुरे सोडविण्यासाठी संबंधित मालकच पुढे येत नसल्याने, जनावरे राखायची तरी किती दिवस असा प्रश्न पडतो. ही जनावरे गो-शाळांकडे सोपविली जातात. त्यामुळे तरतूद असली तरीही फौजदारी गुन्हा दाखल करताना ठेकेदारांना पेच पडलेला असतो.

First Published on: February 9, 2019 12:37 PM
Exit mobile version