काँग्रेसतर्फे जिल्हाभरात शर्म करो मोदी आंदोलन

काँग्रेसतर्फे जिल्हाभरात शर्म करो मोदी आंदोलन

 नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद बुधवारी मनमाड शहरात उमटले. काँग्रेस पक्षाच्या वतीने शर्म करो मोदी आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करत पोलीस अधिकार्‍यांना निवेदन दिले.

संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका तर केलीच शिवाय, त्यांनी देशात कोरोनाचा फैलाव महाराष्ट्रातून झाला आणि त्याला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले व्यक्तव्य हे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचे अवमान करणारे असल्याचे सांगत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यांनी बुधवारी सकाळी काँग्रेस भवनाजवळ शर्म करो मोदी आंदोलन केले. यावेळी अशोक व्यवहारेंसह इतर वक्त्यांनी देशात कोरोनाचे आगमन अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम यांच्या कार्यक्रमामुळे झाल्याचे सांगितले.

त्यावेळी विदेशातून येणार्‍या विमानांवर बंदी घातली गेली असती तर देशात कोरोना आला नसता. देशात कोरोनाला आणण्याचे काम केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी मुर्दाबाद, देशात कोरोना आणणार्‍या केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा विविध घोषणा दिल्या.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अफजल शेख यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात भीमराव जेजुरे रहेमान शहा, शशिकांत व्यवहारे, फकीरा शिवदे, वाल्मिक जगताप, बाळासाहेब मिसर, रामभाऊ बिडगर, नगरसेवक संतोष आहिरे, नाजीम शेख, माजी नगरसेवक संजय निकम आदी उपस्थित होते.

मोदीविरोधी घोषणांनी दणाणले येवला शहर

पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील आपल्या भाषणात महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तसेच, काँग्रेस पक्षावरही खोटे नाटे आरोप केले आहे. त्याबद्दल निषेध करण्यासाठी येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे विंचूर चौफुली, येवला येथे ’शर्म करो मोदी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी यांच्या भाषणाचा निषेध करणार्‍या विविध घोषणा देत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला.

आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, राजेंद्र गणोरे, जयप्रकाश वाघ, मुसा शेख, राजे आबासाहेब शिंदे, लक्ष्मण गवळी, प्रकाश बोडके, बाळू मोरे, विजय ठोंबरे, पंडित पवार, संतोष पवार, भरत गवळी, आनंदा पसारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: February 10, 2022 9:10 AM
Exit mobile version