Devendra Fadnavis Vs Raj Thackeray : असं काय म्हणाले फडणवीस ज्यामुळे राज ठाकरे संतापले, म्हणाले…

Devendra Fadnavis Vs Raj Thackeray : असं काय म्हणाले फडणवीस ज्यामुळे राज ठाकरे संतापले, म्हणाले…

Karnataka Assembly election 2023 कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला. भाजपलाही पराभूत करता येतं हे काँग्रेसने दाखवून दिलं, अशा आशयाच्या सर्वच राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. भाजपच्या पराभवावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप नेत्यांना खडे बोल सुनावले होते. ‘जनतेला गृहित धरु नये’, असा सल्ला राज यांनी भाजप नेत्यांना दिला होता.

राज ठाकरेंच्या कर्नाटक निकालावरील प्रतिक्रियेनंतर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाहेरच्यांनी सल्ले देऊ नये असे म्हटले होते. त्यावरुन आज (शनिवार) राज ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार सुनावले आहे. “तुम्ही (देवेंद्र फडणवीस) कशावरही बोलणार, आणि तुमच्याबद्दल (भाजपा) कोणी काहीच बोलायचे नाही का?” असा संतप्त सवाल राज यांनी केला आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी (देवेंद्र फडणवीस) म्हटलं की इतरांनी कोणी प्रतिक्रिया देऊ नये. तर मग उद्या तुम्हाला अग्रलेखही बंद करावे लागतील. कोणी काही बोलायचचं नाही का यांच्या बाबतीत. आणि हे कशाही बाबतीत बोलणार!” असा खोचक टोलो राज यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना लगावला.

कर्नाटक निकालाबद्दल राज ठाकरे म्हणाले, “एका राज्यावरती तुम्ही देशाचा आराखडा नाही मांडू शकत. पश्चिम बंगालमध्येही भाजपचा पराभव झाला. एका राज्यावरुन ठरवता येणार नाही. येत्या काळात वातावरण कसं बदलतं हे पाहाण्यासारखं असेल.”

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे यांनी कर्नाटकमधील भाजपाच्या पराभवाचे विश्लेषण करताना म्हटले होते की, “विरोधी पक्ष हा जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटतं हा पराभव स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो, अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे, असं मला वाटतं. जनतेला कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा”

राज यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते, “आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करु, ते करण्याकरता आम्हाला दुसरं कोणी नको. ठीक आहे ते त्यांच मत असेल.” त्याच बरोबर फडणवीसांनी कर्नाटकातील निकालासाठी स्थानिकांना जबाबदार ठरवले होते. ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टी अनेक निवडणुका जिंकते, काही निवडणुका आम्ही हरतो. आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याचं कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधी कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात, त्याचं विश्लेषण होईल.”

First Published on: May 20, 2023 12:56 PM
Exit mobile version