मोदी-शहांवर राज ठाकरेंचा नाशिकमध्ये शेवटचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

मोदी-शहांवर राज ठाकरेंचा नाशिकमध्ये शेवटचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

राज ठाकरे यांची नाशिकमधील सभा

राज्यभर झालेल्या राज ठाकरेंच्या सभा कार्यक्रमातली शेवटची सभा नाशिकमध्ये पार पडली. नाशिक महानगरपालिकेत मनसेची एके काळी असलेली सत्ता, मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला आणि मुख्यमंत्र्यांचं दत्तक घेतलेलं शहर या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या या सभेला वेगळंच महत्त्व होतं. तसंच, या सभेमध्ये मोठी पोलखोल करणार असल्याच राज ठाकरेंनी आधीच्या जाहीर सभांमधून सांगितलं होतं. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं.

‘नाशिकच्या बापानं काय केलं?’

नाशिक दत्तक घेत असल्याचं सांगणारा मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ यावेळी राज ठाकरेंनी दाखवला. त्यावेळी ‘या बापानं काय केलं?’ असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. ‘नाशिकमध्ये कांद्याला भाव देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण त्याचं काय झालं? महाराष्ट्रात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यांच्या खोटं बोलायला काय मर्यादा आहेत की नाही?’ असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. ‘जर २८ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होत असतील, तर सिंचनावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये गेले कुठे?’ असंही राज ठाकरेंनी यावेळी विचारलं.

‘कपिल सिब्बलांच्या पत्रकार परिषदेचं काय झालं?’

नोटबंदीवर कपिल सिब्बलांनी पत्रकार परिषद घेतली. पण अनेक टीव्ही चॅनल्सवरून ती पत्रकार परिषद दाखवलीच नाही. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल यांनी केलेले दावे राज ठाकरेंनी यावेळी वाचून दाखवले. ‘नोटबंदी होण्याआधी उर्जित पटेल यांच्या सहीच्या नव्या २०००च्या नोटा मोठ्या प्रमाणात परदेशात छापण्यात आल्या. त्या नंतर भारतात आणून जुन्या नोटांच्या बदल्यात एकूण ३ लाख कोटींच्या नोटा बदलण्यात आल्या. यासाठी रॉची मदत घेण्यात आली. एसबीआयच्या शाखांमधून, एमआयडीसीमधून नोटा बदलून देण्याचे व्यवहार झाले. या नोटा खासगी कंपन्या आणि लोकांना बदलून देण्यात आल्या’, असं या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल यांनी सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले. ‘तसेच, यासंदर्भातल्या व्हिडिओ क्लिप्स आणि पुरावेही या पत्रकार परिषदेत दाखवले गेले’, असं देखील राज ठाकरेंनी सांगितलं.

कपिल सिब्बल यांची पत्रकार परिषद, पुरावे, स्टिंग व्हिडिओ!

‘सरकार फक्त माज करतंय’

दरम्यान, यावेळी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न राज ठाकरेंनी मांडला. मोदींनी २०१४च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी केलेल्या भाषणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचा व्हिडिओ दाखवून त्यानंतर एका वृत्तवाहिनीने केलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा रिपोर्टही त्यांनी दाखवला. ‘सध्याच्या सरकारच्या काळात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि हे सरकार फक्त माज करतंय’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी शेतकऱ्यांविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य वाचून दाखवली.

करदात्यांच्या गिफ्टचं काय झालं?

‘परदेशातला काळा पैसा भारतात आणून त्यातला ५ ते १० टक्के निधी देशातल्या करदात्यांना गिफ्ट म्हणून पुन्हा परत दिला जाईल’, असं आश्वासन देणारा २०१४च्या निवडणुकांच्या आधीचा मोदींच्या ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमातला एक व्हिडिओ राज ठाकरेंनी यावेळी दाखवला. मात्र, तसा कोणताही निधी अद्यापपर्यंत करदात्यांना मिळाला नसल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. काँग्रेसच्या काळात २जी घोटाळ्यातले सर्व आरोपी भाजपच्या काळात सुटले कसे? असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी केला. या लोकांनी खोटी आश्वासनं देऊन मलासुद्धा फसवलं, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

पाहा राज ठाकरेंची नाशिकमधली शेवटची सभा!

First Published on: April 26, 2019 9:31 PM
Exit mobile version