रामेश्वर ग्रामपंचायत ठरली स्मार्ट

रामेश्वर ग्रामपंचायत ठरली स्मार्ट

रामेश्वर ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता ग्रामोत्थान अभियान सुरु करण्यात आलेले आहे. भौतिक, सामाजिक व उत्पन्न साधने या तीन क्षेत्रात शासनाच्या आर्थिक, तांत्रिक व प्रशासकिय सहकार्याने, लोकांच्या पुढाकाराने हा विकास अपेक्षित होणार आहे. यापैकी दर्जेदार भौतिक मुलभूत सुविधांसाठीचा हा कार्यक्रम आहे. शाश्वत ग्रामविकास संकल्पनेत महत्त्वाचे तत्त्व असे आहे की, गावात एकीकडे उच्च प्रतिच्या भौतिक सुविधांची निर्मिती करतानाच यासाठी लागणार्‍या नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग पर्यावरणाचा समतोल राखून कसा करता येईल याचाही प्राधान्याने विचार झाला पाहिजे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास होत आहे. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. म्हणून शासनाने पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना सन २०१०-११ मध्ये सुरु केली. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी पिंपळगाव, मटाने व रामेश्वर या तीन ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. शासनाच्या २१ नोव्हेंबर २०१६ मधील परिशिष्ट अ मधील निकषानुसार स्वच्छता, आरोग्य, सौर ऊर्जा, अटल पेन्शन योजना, पाणी गुणवत्ता, सुकन्या समृद्धी योजना, भूमिगत गटारी, गावात एकही गुन्हा नोंद नसलेबाबत, बायोगॅस, पथदिवे आदी कामांची समितीने केलेल्या पाहणी अहवालात रामेश्वर ग्रामपंचायत शासनाच्या निकषात बसल्याने सन २०१९-२० मधील तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी रामेश्वर गावाची निवड करण्यात आली आहे. यासाठी गावाला शासनाकडून १० लाखांचे बक्षीस मिळणार असून, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन कामकाज केले जाईल, अशी माहिती उपसरपंच विजय पगार यांनी दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेविका वैशाली येळीज आदी उपस्थित होते.

First Published on: July 12, 2021 8:00 AM
Exit mobile version