वैद्यकीय महाविद्यालयात भरती

वैद्यकीय महाविद्यालयात भरती

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी एकूण सात विषयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात तज्ज्ञ शिक्षकांची निवड करण्यासाठी विज्ञापीठाने जाहीरात प्रसिध्द केल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय महाविद्यालयाची आढावा बैठक पालकमंत्री भुजबळांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या अभ्यासक्रमातंर्गत औषध वैद्यकशास्त्र 12, बालरोग चिकित्सा शास्त्र 6, शल्य चिकित्सा शास्त्र 12, अस्थिरोग शास्त्र 6, भुल शास्त्र 14, स्त्रीरोग चिकित्सा व प्रस्तुती शास्त्र 6, अपत्कालीन औषध वैद्यकशास्त्र 3 अशा एकूण 59 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एकुण 49 अनुभवी अधिष्ठाता व विशेषतज्ञांची नेमणूक करण्यासाठी जाहिरात देण्यात आली असून, 27 ते 31 जानेवारी 2022 या दरम्यान मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे.

670 कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून, विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीच्या कामकाजाबाबत आवश्यक सर्व प्रमाणपत्र, सामंजस्य करार व इतर महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करून प्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले आहे. दोन महिन्यांत इमारतीचे बांधकाम सुरु होईल, असे त्यांनी सांगितल्याने नाशिककरांची दीर्घकालिन प्रतीक्षा आता संपली आहे.

First Published on: January 7, 2022 8:45 AM
Exit mobile version