भाजपच्या गटनेतेपदावरून का झाली जगदीश पाटील यांची गच्छंती?

भाजपच्या गटनेतेपदावरून का झाली जगदीश पाटील यांची गच्छंती?

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राच्या जागेच्या आरक्षण बदलात फेरफार केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन गटनेते जगदीश पाटील यांनी केली खरी; परंतु बाळासाहेब सानप यांचे ‘अच्छे दिन’ सुरु होताच त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पाटील यांची गटनेते पदावरून गच्छंती करून बदला घेतल्याचे बोलले जाते. महत्त्वाचे म्हणजे, या वादात सभागृह नेते सतीश सोनवणे यांचाही बळी गेला असून त्यांच्या जागेवर कमलेश बोडके यांची नियुक्ती झाली आहे. गिरीश महाजन यांचा वरदहस्त पाटील आणि सोनवणे यांच्यावर असतानाच बाळासाहेबांनी थेट प्रदेशाध्यक्षांशी संधान साधल्याने महाजन यांची डाळ या प्रकरणात शिजलीच नाही, अशी चर्चा भाजपमध्येच दबक्या आवाजात सुरू आहे.

गेल्या सोमवारी (दि. ३१) झालेल्या अंदाजपत्रकीय महासभेत भाजपमधील हे राजकीय नाट्य रंगले. या नाट्याला गेल्या विधानसभा निवडणुकीतील घटनांची किनार होती. या निवडणुकीच्या वेळी तत्कालीन आमदार सानप यांना भाजपकडून उमेदवारी नाकारली जाणार हे काही दिवस आधीच बोलले जात होते. त्यावेळी मनसेत असलेले अ‍ॅड. राहुल ढिकले यांना भाजपने ‘रेड कार्पेट’ अंथरले होते. सानपांच्या पडत्या काळातच तत्कालीन गटनेते जगदीश पाटील यांनी त्यांच्यावर लेटर बॉम्बसह व्हिडिओ बॉम्ब टाकला होता. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राच्या जागेच्या आरक्षण बदलात फेरफार केल्याचा जगदीश पाटील यांच्या लेटरबॉम्बने भाजपमध्ये खळबळ उडवून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा व्हिडीओ क्लिप तयार करीत बाळासाहेब सानप आणि तत्कालीन महापौर रंजना भानसी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. आपण रुग्णालयात उपचार घेत असतानाच, २०१६ च्या जुन्या पत्रावर उपसूचना देण्याची आमदार, महापौरांना घाई का, असा सवाल त्यांनी त्यावेळी केला होता. याच काळात तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील सानप यांच्यावर नाराज असल्याने भाजपकडून बाळासाहेबांना उमेदवारी नाकारण्यात आली. राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवून त्यात पराभव झाल्यानंतर सानप यांनी काही काळ शिवसेनेत काढले. या काळात त्यांनी महापौरपद शिवसेनेकडे आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी कमलेश बोडके यांच्यासह भाजपच्या काही नगरसेवकांनाही आपल्या बरोबर घेतले. परंतु, गिरीश महाजनांच्या खेळीने भाजपकडे महापौरपद शाबूत राहिले. त्यानंतर सानप हे स्वगृही परतले. परंतु दुर्देवाने कोरोना आजाराने त्यांना बाधित केले. या आजारातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय झाले आहेत.

महापालिकेतील सभागृह नेता आणि गटनेता बदलून त्यांनी या नव्या ‘इनिंग’ला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे ‘फिल्डिंग’ लावण्यात आली. सतीश सोनवणे आणि जगदीश पाटील हे गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांचे पद वाचवण्यासाठी महाजनांनी सगळी शक्ती एकवटल्याचेे बोलले जाते. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी बदलून सानप यांच्याकडे कौल दर्शवला. जगदीश पाटील यांचे पद काढण्याचा निर्णय झाला नसता तर कदाचित सतीश सोनवणे यांचेही पद वाचले असते. परंतु, दोघांना सारखाच न्याय द्यायचे कारण दाखवत आणि पक्षापासून काहीसे दुरावलेले बोडके आणि अरुण पवार यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी त्यांना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.

दोघांच्या भांडणात महापौरांची कोंडी

पाटील आणि सोनवणे यांच्या जागेवर पवार आणि बोडके यांची नियुक्ती करण्याचा आदेश प्रदेशाध्यक्षांकडून आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णीही काहीसे अस्वस्थ झाल्याचे कळते. त्यांच्या खंदे साथीदारांचे पद जात असल्याने महापौरांसह पालिकेतील अन्य काही पदाधिकारी व नगरसेवकांनी ही पदे शाबूत राखण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यानच्या काळात गिरीश महाजनांनीही काही काळासाठी हा बदल थांबवल्याचे कळते. मात्र, प्रदेशाध्यक्षांच्या आदेशापुढे अखेर सर्वांनाच नमते घ्यावे लागले. या सर्व घटनांमुळे महापौरांची मात्र पुरती कोंडी झाली. सोमवारी (दि. १) सुरु असलेल्या महासभेत महापौरांची याच कारणाने अधिक चिडचिड होत होती, असे बोलले गेले.

महाजनांऐवजी चंद्रकांतदादांकडे नाशिकची जबाबदारी?

गेल्या पंचवार्षिक काळात नाशिकची धूरा गिरीश महाजनांवर पालकमंत्रीपदाच्या रूपाने सोपवण्यात आली होती. महापालिका निवडणुकीवेळी महाजन आणि बाळासाहेब सानप या दोघांनीही अनुभव पणाला लावत घवघवीत यश संपादन केले. शिवाय सत्ताही खेचून आणली. आता मात्र महाजन आणि सानप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिकची जबाबदारी महाजनांऐवजी चंद्रकांत पाटील यांच्याकडेच सोपवण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यास पक्षाकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

First Published on: June 2, 2021 11:59 PM
Exit mobile version