ग्रामीण पोलिसांचा दणका सुरूच; गांजा, अल्प्राझोलम गोळया जप्त

ग्रामीण पोलिसांचा दणका सुरूच; गांजा, अल्प्राझोलम गोळया जप्त

Ganja

नाशिक : जिल्ह्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी ६ ते ३१ ऑगस्ट २०२३ या २६ दिवसांमध्ये अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवले. या कालावधीत पोलिसांनी १० कारवाया केल्या असून, एकूण १४ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून १२ किलो गांजा व २ हजार ३०५ अल्प्राझोलम अर्थात कुत्ता गोळया असा एकूण १ कोटी ६८ हजार १३६ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मालेगाव मधील पवारवाडी, किल्ला, मालेगाव शहर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत, नाशिक तालुका, चांदवड, सायखेडा, सिन्नर, सिन्नर एमआयडीसी व वावी या इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाया करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आरोपीतांविरूध्द अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस) या कायद्यखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या आरोपीतांपैकी ३ आरोपी पोलीस कोठडीत असून, पोलीस त्यांच्याकडे तपास करत आहेत.

नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायाविरुद्ध सुरू केलेले हे अभियान यापुढेही अव्याहतपणे सुरू राहील. गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत नाशिक ग्रामीण पोलीस सर्वच अवैध व्यवसायाविरुद्धची मोहीम आणखी तीव्र करणार आहेत. जिल्ह्यात अवैध धंदे व अंमली पदार्थांची वाहतूक, साठा व विक्री केली जात आहे, अशा ठिकाणी व व्यक्तींची नावे नाशिक ग्रामीण पोलिसांना द्यावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नागरिकांना अवैध व्यवसायांविषयी काही माहिती असल्यास नाशिक ग्रामीण पोलीसांच्या हेल्पलाईन क्रमांक ६२६२ २५६३६३ यावर द्यावी. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. अवैध व्यवसायांच्या उच्चाटनासाठी पोलीसांना सहकार्य करावे. : शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

‘अल्प्राझोलम’ गोळ्यांचा नशेसाठी वापर

अ‍ॅलोपॅथी उपचार पध्दतीत मानसिक विकार, निद्रानाश यासारख्या कारणांसाठी प्रामुख्याने ‘अल्प्राझोलम‘ हे औषध रुग्णांना दिले जाते. गोळ्यांच्या स्वरुपातील या औषधाचे दर तुलनेने स्वस्त आहेत. हे औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिले जाऊ शकत नाही. परंतु, या नियमाकडे डोळेझाक करून औषध दुकानदारांकडून चढया दरात ते विकले जात आहे. ‘अल्प्राझोलम‘ या औषधी गोळ्यांचा नशेसाठी अवैधपणे होणारा वाढता वापर मालेगावात डोकेदुखी निर्माण करणारा ठरत आहे. ‘कुत्ता गोळी‘ या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणार्‍या या उत्तेजक औषधाचा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांकडून नशा करण्यासाठी वापर केला जात आहे.

First Published on: September 2, 2023 3:57 PM
Exit mobile version