एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सुनंदा गोसावी यांचे निधन

एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सुनंदा गोसावी यांचे निधन

महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सुनंदा गोसावी यांचे निधन

नाशिक – शहरातील नामांकित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सुनंदा गोसावी (वय ८४) यांचे मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. संस्थेचे सचिव तथा डायरेक्टर जनरल डॉ. मो. स. गोसावी यांच्या त्या पत्नी आणि संस्थेच्या एचआर डायरेक्टर व एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या मातोश्री होत. बुधवारी (दि. १) सकाळी ९ वाजता द्वारका येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महिला शिक्षण व सबलीकरणासाठी पुढाकार घेणार्‍या डॉ.सुनंदा गोसावी यांनी एम. ए., पीएच. डी. (मराठी) पर्यंत शिक्षण घेतले. तसेच, साहित्य व संगीत क्षेत्राची विशेष रुची असलेल्या डॉ. सुनंदा यांची ओळख साहित्य विशारद, संगीतरत्न म्हणूनही होती. केवळ शिक्षण व साहित्य या क्षेत्रापर्यंत मर्यादित न राहता त्यांनी गृहिणी म्हणून सर्व जबाबदार्‍या सांभाळल्या. जिज्ञासा महिला महाविद्यालय, नाशिक येथे १९७५ पासून १९८५ पर्यंत त्या मानद प्राध्यापिका व संचालिका म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर एसएमआरके महाविद्यालयात संस्थापक प्राचार्य म्हणून त्यांनी १२ वर्षे जबाबदारी सांभाळली. प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे वाड्:मयाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर मराठीत संशोधन (पीएच.डी.) केले.

कला, वाणिज्य, गृहविज्ञान, ललित याबरोबरच संगीत, संगणक, परिचर्या, विज्ञान, मानवविकास, आहारशास्त्र, कला वस्त्रोद्योग, विणकाम, कुटुंबा-गदा-व्यवस्थापन यातील पदवी, पदवीका, अभ्यासक्रमाची उत्तर महाराष्ट्रात प्रथम सुरुवात करुन दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना उद्योजक घडविण्यास पायाभूत कार्य व यशस्वी मार्गदर्शन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महिलांच्या व्यक्तित्व विकासासाठी स्वानंद भजनी मंडळाची स्थापना केली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

First Published on: November 30, 2021 9:40 PM
Exit mobile version