मविप्रला कोपरगावच्या बाह्यशक्तींपासून वाचवा : बनकर

मविप्रला कोपरगावच्या बाह्यशक्तींपासून वाचवा : बनकर

नाशिक : कर्मवीरांसह समाजधुरिणांनी अडचणींच्या काळात मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची मजबूत पायाभरणी केली. मात्र, आता कोपरगावच्या धर्तीवर कुटुंब केंद्रीत व्यक्तींकडून संस्थेचा कारभार हाकला जात आहे. जिल्ह्यापेक्षा बाहेरील बाह्यशक्ती संस्थेत घुसखोरी करत आहेत. त्यामुळे कुटुंब केंद्रीकरणापासून वाचवण्यासाठी परिवर्तन करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन येवल्याचे जेष्ठ नेते अंबादास बनकर यांनी केले.

परिवर्तन पॅनलचा येवला, नांदगाव, मालेगाव तालुका दौरा रविवारी (दि.21) पार पडला. कारभारी बोरनारे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बनकर म्हणाले की, नितीन ठाकरे यांचा वारसा समृद्ध असून कर्मवीर अ‍ॅड. बाबुराव ठाकरे यांच्या 22 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही प्रांतवाद केला नाही. त्यांचाच समृद्ध वारसा अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या रूपाने संस्थेत निवडून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नांदगाव येथे झालेल्या सभेत माजी संचालक साहेबराव पाटील यांनी अमित पाटील यांच्या रूपाने तरुण चेहर्‍याला संधी दिल्याबद्दल नितीन ठाकरेंचे आभार मानले. नगराध्यक्ष व्यंकट आहेर, राजेश कवडे, विश्वास कवडे, चंद्रसेन आहेर, उमाकांत थेटे, बाळासाहेब कवडे, योगेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मालेगाव तालुक्यात दाभाडी, पिंपळगाव, वडनेर खाकुर्डी, सौंदाणे येथेही परिवर्तन सभा झाली. यावेळी मालेगावचे उमेदवार आर. के. बच्छाव यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात झालेल्या इमारत उद्घटनात संस्थेने जुन्याला नवीन रंग देत सभासदांची दिशाभूल केली. त्यामुळे यावेळी परिवर्तन पॅनलच्या पाठीशी मतदार खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

गेल्या पाच वर्षात प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचून भावना जाणून घेतल्याचे सांगत अ‍ॅड.नितीन ठाकरे म्हणाले की, येवला, नांदगावसह मालेगावकर यावेळी खोट्या भूलथापांना बळी न पडता परिवर्तन घडवतील असा विश्वास आहे. मालेगाव तालुक्यात परिवर्तन पॅनलला मिळत असलेला प्रतिसाद बघता विरोधकांचा पराभव अटळ असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

First Published on: August 22, 2022 5:45 PM
Exit mobile version