ईव्हीएम जपून ठेवा…!

ईव्हीएम जपून ठेवा…!

यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रामाणिक उमेदवाराला धनशक्ती, दारुच्या पार्ट्या, गुंडगिरी, बोगस मतदान वगैरे बाबींची भीती वाटायची. पण यंदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्वाधिक भीती वाटतेय ती ईव्हीएम मशिनची. विजयाची सारीच गणितं या मंडळींकडे तयार आहेत. पण ईव्हीएमविषयी साशंकता असल्यानं निवडून येण्याची कुणालाही शाश्वती वाटत नाही. अर्थात, पराभूत झाल्यावर ईव्हीएमवर खापर फोडणं सर्वात सोपं तंत्र झाल्याने ईव्हीएमचा जप जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केला जातोय. जिल्हाधिकार्‍यांसमोर झालेल्या बैठकीतही याचा प्रत्यय आला. या बैठकीत उमेदवारांना निवडणुकीसंदर्भातील काही महत्वाच्या सूचना दिल्या गेल्या. अखेर उपस्थितांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. त्यात एकाने ईव्हीएम मशिनचा मुद्दा उपस्थित केला. मतदानानंतर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम जिथे ठेवले त्याचे सीसी कॅमेर्‍यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सर्वांनाच दिसायला हवे, अशी सूचना त्याने केली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी हतबलता दर्शवली. ही बाब आपल्या अखत्यारित नसल्याचं त्यांनी सांगितलं. याला पर्याय मात्र त्यांनी सूचवला. ईव्हीएम मशिन ज्या ठिकाणी ठेवणार आहोत, त्या ठिकाणाबाहेर उमेदवाराने एखाद्या कार्यकर्त्याला मतमोजणीच्या दिवसापर्यंत मुक्कामी ठेवावं. त्याला राहण्यासाठी टेंटची व्यवस्था आमच्याकडून केली जाईल, असंही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलं. पण, चिंतातूर जंतू असलेल्या उमेदवाराचं यामुळे समाधान काही झालंच नाही. त्याने प्रतीप्रश्न केले. ‘आम्ही जो कार्यकर्ता देखरेखीसाठी नेमू तोच जर फुटला तर? त्यालाच कुणी मॅनेज केलं तर?’.. या प्रश्नाने जिल्हाधिकार्‍यांचीही बोलती बंद केली. ‘तुमच्याकडे भरवसा ठेवण्यासारखा एकही कार्यकर्ता नसेल तर तुम्ही निवडणूक लढवता कोणाच्या आधारावर’, असा प्रश्न यावेळी जिल्हाधिकार्‍यांना पडला नसेल तर नवल… आता बोला!- मिस्सळवाला

First Published on: April 24, 2024 2:26 PM
Exit mobile version