नाशिक उपकेंद्राला दिवाळीचा मुहूर्त

नाशिक उपकेंद्राला दिवाळीचा मुहूर्त

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा मार्ग अखेर मोकळा झाला असून नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर या उपकेंद्राचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर 2021 या नवीन वर्षात व्यावसायभिमूख अभ्यासक्रमही सुरु करण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये दिली.

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यानंतर त्यादृष्टीने मुक्त विद्यापीठाचा आढावा घेण्यासाठी ते रविवारी (दि.20) नाशिकमध्ये आले होते. यावेळी पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राबाबत सामंत म्हणाले की, दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे उपकेंद्रासाठी जागा आरक्षित आहे. परंतु, उपकेंद्राच सुरु होत नसल्यामुळे या जागेवर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढून येत्या नोव्हेंबरपासून विद्यापीठ उपकेंद्राचे बांधकाम सुरु करण्याच्या हालचाली सुरु होतील. पुणे विद्यापीठ स्व:खर्चाने हे उपकेंद्र उभारणार आहे. नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारी इमारत उभारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

वायनरी, पैठणी अभ्यासक्रम

नाशिकमध्ये वायनरी, पैठणी व फूड टेक्नॉलॉजीशी संदर्भात व्यावसायभिमुख अभ्यासक्रम सुरु केल्यास विद्यार्थ्यांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभेल, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमाळकर यांनी दिल्याचे शिक्षणमंत्री सामंत यांनी म्हणालेे. सद्यस्थितीला एमबीए हा अभ्यासक्रम नाशिक उपकेंद्रात शिकवला जात आहे. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमही यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते.

अतिक्रमण काढण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना आदेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्रासाठी शिवनई (ता.दिंडोरी) येथे 62 एकर जागा आरक्षित केली आहे. उपकेंद्राचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी हे अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे सूसज्ज इमारत बांधण्यात येणार असून, त्यासाठी पुणे विद्यापीठ स्व:खर्चातून निधी उभारणार आहे.

First Published on: September 20, 2020 9:24 PM
Exit mobile version