शहराध्यक्षपदासाठी ‘नॉन मराठा’ नेतृत्वाचा शोध

शहराध्यक्षपदासाठी ‘नॉन मराठा’ नेतृत्वाचा शोध

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना काँग्रेस पक्षानेही आता शहराध्यक्षपदासाठी नेतृत्वाचा शोध सुरु केला आहे. महापालिकेतील कामाचा अनुभव असलेल्या ‘नॉन मराठा’ नगरसेवकाला पक्षाने गळ घातल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांमध्येच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अधिकृतपणे त्याची घोषणा करणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, गेल्या काही वर्षात पक्षाची इतकी वाताहत झाली की हिरामण खोसकर यांच्या रुपाने एकच आमदार निवडूण आला. त्यांना राष्ट्रवादीतून ऐनवेळी आयात करुन उमेदवारी द्यावी लागली. महापौरांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांची भूमिका संशयास्पद राहिली. तर जिल्हा परिषदेत आश्विनी आहेर यांच्या रुपाने महिला व बालकल्याण समिती सभापतीपद राखण्यात पक्षाला कसेबसे यश आले. आठ महिन्यांवर आलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. अशा परिस्थितीत भाजप, शिवसेना जोरदार तयारीला लागले असताना काँग्रेस पक्षातील नेत्यांनी अजूनही मरगळ झटकलेली दिसत नाही. येथील नेत्यांना आलेली सुस्ती प्रदेशाध्याक्षांनाही आवडलेली दिसत नाही. कारण जिल्ह्याच्या आढावा बैठकीत पटोलेंनी ही बाब प्रकर्षाने बोलून दाखवली होती. त्यातच शहराध्यक्ष शरद आहेर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने एकाच व्यक्तिकडे दोन पदे ठेवण्याचा पक्षश्रेष्ठींचा मानस दिसत नाही. त्यामुळे शहराध्यक्षपदी नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. त्यात प्रामुख्याने पक्षातून बाहेर पडलेल्या व्यक्तिंना परत बोलवून त्यांना पुन्हा संधी देण्याचा विचार चालू आहे. विशेषत: महापालिकेत पक्षाची प्रतिमा अधिक उंचावेल आणि त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील, असा निकष लावला जात आहे. यात सर्व आघाड्यांना सोबत घेवून निवडणुका लढवेल, अशा व्यक्तिचा पक्षाकडून शोध घेतला जात आहे.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्या व्यक्तिंना परत येण्यासाठी गळ घातली जात आहे. यात पंचवटी, नाशिकरोड, जुने नाशिक, नाशिक मध्य येथील विद्यमान नगरसेवकांकडे विचारणा केली जात आहे. सध्यातरी यापैकी कुणीही उघडपणे कुणीही सांगत नसले तरी, पक्षांतर्गत हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे येत्या काही दिवसांत त्याची अधिकृतपणे घोषना करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढू शकतात. त्यादृष्टीने पालकमंत्र्यांच्या निकटवर्तियाचा विचार होऊ शकतो.

First Published on: June 7, 2021 4:35 PM
Exit mobile version