जुन्या वाड्याचे पत्रे उचकटून दागिने, रोकड लंपास करणारे सात चोरटे गजाआड

जुन्या वाड्याचे पत्रे उचकटून दागिने, रोकड लंपास करणारे सात चोरटे गजाआड

नाशिक शहरातील दाट लोकवस्ती व वर्दळचे ठिकाण असलेल्या नाव दरवाजा परिसरातील जुन्या वाड्यातून ९ लाख ८१ हजार ५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोकड लंपास करणार्‍या सात चोरट्यांच्या नाशिक शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून ५ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ७ तोळे सोने, ४.७५ किलो चांदी, तांबे व पितळाचे भांडी, प्लंबिग साहित्य व रोख रक्कमेचा समावेश आहे.

निखील संजय पवार (वय २०, रा. हिरावाडी, पंचवटी), योगेश चंद्रकांत साळी (वय २०, रा.लेखानगर, सिडको), राजेंद्र अशोक अहिरराव (वय ४१, रा. म्हसरुळटेक, भद्रकाली), यशवंत ऊर्फ दौलत शंकर सोनवणे (वय २५, रा. डंगरआळी, जुने नाशिक), अमोल किसन राजधर (वय ३६, रा. हुंडीवाला लेन, दहिफुल, नाशिक) यांच्यासह दोन विधीसंघर्षित बालकांना अटक केली.

9 जून रोजी भद्रकालीतील नाव दरवाजा परिसरातील वाड्याचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी मंदार प्रभाकर वडगावकर यांचे मामा किर्तीकुमार शंकर औरंगाबादकर यांच्या वाड्यातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, 60 हजार रुपये व एक सिलिंडर असा एकूण ९ लाख ८१ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी मंदार वडगावकर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भद्रकाली व पंचवटी पोलिसांनी तपास सुरु केला. निखील पवार व त्याच्या साथीदाराने घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी निखील पवार, योगेश साळीसह दोन विधीसंघर्षित बालकांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पवारकडून १ लाख ७४ हजार ६०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व ४० हजार रुपये रोख जप्त केले. चोरी केलेले काही दागिने राजेंद्र अहिरराव, यशवंत सोनवणे, अमोल राजधर यांना दिले होते. पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ९६ हजारांचे दागिने जप्त केले. पोलिसांनी एकूण ५ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

First Published on: June 16, 2021 8:22 PM
Exit mobile version