चर्चा युतीची, तयारी स्वबळाची!

चर्चा युतीची, तयारी स्वबळाची!

शिवसेना आयोजित संवाद बैठकीत मार्गदर्शन करताना संपर्क प्रमुख भाउसाहेब चौधरी. समवेत शिवसेने पदाधिकारी व कार्यकर्ते.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युती होणार असल्याचे बोलले जात असले तरी, शिवसेना स्वबळाच्या तयारीला लागली आहे. त्यादृष्टीने या पक्षाचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी गुरुवारी शहरात प्रभागनिहाय आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याची सूचना केली.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यात एक महिन्यांचा अवधी शिल्लक असताना युतीविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना व भाजप एकत्र येणार असल्याचे सांगिंतले जात असले तरी, जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गाफिल न राहता स्वबळाची तयारी ठेवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना दिले. युतीची चर्चा सोडून पक्षाचे नेते तयारीला लागले आहेत. ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर नाशिक जिल्हा दौर्‍यावर येऊन गेल्यानंतर गुरुवारी ७ फेब्रुवारीस जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शहरात ‘संवाद बैठका’ घेतल्या. सकाळी १० ला लोणार गल्ली येथील प्रभाग क्रमांक सातचा आढावा घेण्यात आला.

पी अ‍ॅण्ड टी कॉलनी येथील दत्तमंदीर परिसरात प्रभाग १२ च्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना त्यांनी तयारी राहण्याचे निर्देश दिले. आगामी निवडणुका शिवसेना पक्षासाठी सर्वात मोठी लढाई राहणार आहे. बुथनिहाय नियोजन करणे आवश्यक आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला किंमत द्यायला हवी. फक्त बैठकांपुरते कार्यकर्त्यांना न सांभाळता नियमित त्यांच्या संपर्कात राहायला हवे. निवडणुकीच्या दृष्टीने बुथनिहाय सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केली. युवकांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न करा. काम करणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षात समाविष्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दुपारच्या सत्रात प्रभाग क्रंमाक तेरा, पंधरा, सोळा व तीस येथे आढावा बैठका घेण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, माजी महापौर विनायक पांडे, जयंत दिंडे, उपमहानगरप्रमुख सचिन बांडे यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

गटनेत्यांची रस्सीखेच सुरुच

शहरात आढावा बैठका सुरू असताना दुसर्‍या बाजूला जिल्हा परिषदेच्या शिवसेना सदस्यांमध्ये गटनेता निवडीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आले. निफाड तालुक्यातील उगाव गटाचे सदस्य बाळासाहेब क्षिरसागर व कसबे सुकेणे गटातील दीपक शिरसाठ यांच्यात ही रस्सीखेच सुरु आहे. गटनेता निवडण्याचे अधिकार चौधरी यांच्याकडे असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी दोघेही उत्सुक असल्याचे दिसून आले. गटनेता निवडीवर शिक्कामोर्तब होण्यासाठी दोघेही जिल्हा परिषदेत तळ ठोकून होते.

First Published on: February 8, 2019 9:52 PM
Exit mobile version