सुहास कांदेंवरील कारवाईमुळे नांदगावला शिवसेनेची नाराजी

सुहास कांदेंवरील कारवाईमुळे नांदगावला शिवसेनेची नाराजी

युतीतील पक्षांचे पूर्णत: मनोमिलन अद्याप झालेले नसून दिंडोरी लोकसभा मतदार संघात शिवसेना आता एका अनोख्या मागणीसाठी अडून बसली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना काही दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर ते भूमिगत आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा ससेमिरा कायमस्वरुपी टळावा, अशी अट घालत तिची पूर्तता होत नाही तोपर्यंत दिंडोरी मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव तालुक्याचे सर्वाधिक मतदार आहेत. आमदार राष्ट्रवादीचे असले तरी मनमाड व नांदगाव बाजार समिती, नगरपरिषदेत सेनेची सत्ता आहे. काँग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड.अनिलकुमार आहेर तालुक्यातील आघाडीचे शिलेदार दिसत असले तरी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्यामुळे प्रचारात फारसा उत्साह संचारलेला दिसून येत नाही. युतीतर्फे नागापूरचे माजी आमदार संजय पवार यांच्यासह स्थानिक नेते प्रचारात सक्रिय दिसतात. मात्र, त्यांना शिवसैनिकांची हवी तशी साथ मिळत नसल्याचे उघडपणे दिसून येते. कार्यकर्ते भाजपवर नाराज आहेत, तर शिवसेनेवर नाराज असलेले पदाधिकारी अगोदरच शिवबंधन तोडून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे दोघांचे मनोमिलन घडवून आणण्याची प्रमुख जबाबदारी असणारे जिल्हाप्रमुख सुहास कांदे अडचणीत असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांचा प्रश्न अगोदर मार्गी लावा नंतर युतीचा प्रचार करू, अशी अटकळ त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना घातल्याचे समजते. येथील नेत्यांशी पालकमंत्र्यांनी स्वत: संपर्क साधत उमेदवाराला प्रचारात मदत करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पदाधिकार्‍यांना बुस्ट मिळालेला असला, तरी कार्यकर्त्यांची नाराजी दूर न झाल्याने नांदगाव तालुक्यातील प्रचाराचा रंग फिका पडलेला दिसतो.

कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचल्या आहेत

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्याविषयी कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचल्या असून, पालकमंत्र्यांकडे आम्ही मागणी करणार आहोत. न्यायालयीन प्रकरणाविषयी बोलणे योग्य होणार नाही. मात्र, पक्षाकडे त्यांच्या सद्भावना आहेतच. कार्यकर्त्यांनी त्याचा विचार करून काम करावे. – भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना.

First Published on: April 3, 2019 11:30 PM
Exit mobile version