आक्रमक महिलांकडून भावली धरणावर शोले स्टाईल आंदोलन

आक्रमक महिलांकडून भावली धरणावर शोले स्टाईल आंदोलन

इगतपुरी : तालुक्यातील इगतपुरी, घोटी तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहराला आणि समृद्धी महामार्ग प्रकल्प यांना भावली धरणाचे पाणी दिले जात आहे. मात्र याच भागातील मानवेढे व परिसरातील गावांना मात्र तहानलेले ठेवले जात आहे. यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी थेट भावली धरणावर जाऊन सर्व योजनांचा पाणीपुरवठा बंद पाडला. जोपर्यंत मानवेढे व परिसरातील गावांना पाणी दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. ह्यामध्ये पुरुषांनी सुद्धा मोठ्या संख्येने भाग घेतला आहे. आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत पदाधिकारी करीत असून यामुळे प्रशासनाला मात्र घाम फुटला आहे.

धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असून भावली धरणावर मानवेढेगाव व परिसरातील आक्रमक महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात केली. जलजीवन योजनेंतर्गत मानवेढे येथे पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक कारणामुळे बंद असल्यामुळे परिसरातील अनेक वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लगतच असणार्‍या समृद्धीच्या कामासह इगतपुरी आणि घोटीच्या पाणीपुरवठा योजनेला पाणी दिले जात आहे. मात्र गावकरी पाण्यावाचून तहानलेले आहे. त्यामुळे संतापलेल्या महिला ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन करून समृद्धी आणि इगतपुरीचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणार नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. गांवकर्‍यांची समजूत घालण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड व इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम असल्याचे दिसून आले.

 

First Published on: December 9, 2022 11:49 AM
Exit mobile version