जुने नाशिकमधील दुकानांना आग; ५० दुचाकी जळून खाक

जुने नाशिकमधील दुकानांना आग; ५० दुचाकी जळून खाक

जुने नाशिकमधील चौक मंडई परिसरातील नुरी चौकालगतच्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी (दि.२२) सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत वाहन बाजार दुकानाशेजारील भंगारमालाची तीन दुकाने व दोन घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या सुमारे २० जवानांनी नऊ बंबाच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. शॉर्टसर्किट व बॅटरीच्या स्फोटामुळे आग भडकल्याची चर्चा परिसरात रहिवाशांमध्ये सुरू होती.

नुरी चौक परिसर दाट लोकवस्ती असून, या ठिकाणी ऑटोमोबाइल, भांगरमालाची दुकाने, गॅरेज, वेल्डिंगची दुकाने आहेत. नुरी चौकात उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार दुकान आहे. या वाहन बाजारात सकाळी कोणीही नसताना अचानक आग लागली. आगीमुळे वाहन बाजारातील सुमारे 50 हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिक युवकांनी मदतकार्य सुरु केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.

मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, केंद्र प्रमुख दत्तात्रय गाडे, लिडिंग फायरमन किशोर पाटील, संतोष आगलावे, राजेंद्र मोरे अनिल गांगुर्डे, घनश्याम इंफळ, प्रदीप बोरसे, प्रदीप परदेशी, इसहाक काझी, नाझीम देशमुख, गणेश गायधनी, शरद देटके, राजेंद्र खरजुल, बाळू पवार यांच्यासह प्रशिक्षणार्थी जवान यश वझरे उमेश सोनवणे यांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.

First Published on: April 22, 2024 1:39 PM
Exit mobile version