१०.९२ कोटींच्या कर्जफेडीला श्रीराम बँकेचा ‘ना-ना’

१०.९२ कोटींच्या कर्जफेडीला श्रीराम बँकेचा ‘ना-ना’

विजूनाना पाटील यांच्या अधिपत्याखालील श्रीराम बँकेकडे १०.९२ कोटींची थकबाकी.

नाशिक शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानाने कर्ज पुरवणार्‍या श्रीराम सहकारी बँकेकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल १०.९२ कोटी रुपये थकले आहेत. तत्कालीन संचालकांनी संस्थेच्या नियमांना आडवा हात लावून आपल्या मर्जितील सभासदांना कर्जाची खिरापत वाटल्यामुळे वर्षानुवर्षांचे थकले. परिणामी, एवढी नामांकित बँक आता अवसायनात निघाली आहे. यात संचालकांचे फावले. मात्र, जिल्हा बँक हे कर्ज वसूल करण्यासाठी आजही कायदेशीर लढा देत आहे.

जिल्हा बँकेच्या धडक वसुली मोहिमेस भाजप, शिवसेना युतीसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही कडाडून विरोध केला आहे. मात्र, बँकेला वाचवायचे असेल, तर वसुलीशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून बँकेने आपली मोहिम रेटवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जिल्ह्याची आर्थिक गंगाजळी सांभाळणार्‍या जिल्हा बँकेला बुडवण्यात सर्वाधिक हातभार लाभला, त्यात श्रीराम बँकेचादेखील समावेश होतो. शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींना कर्ज पुरवठा करणारी बँक म्हणून श्रीराम बँकेचा नावलौकिक होता. भाजपचे आमदार बाळासाहेब सानप कधिकाळी या बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्यांच्या काळात बँकेचे सुगीचे दिवस अनुभवले. मात्र, २००२-०३ पासून बँकेला अवकाळी लागण्यास सुरुवात झाली. वसुली थकल्यामुळे बँकेचा एनपीए वाढला आणि बँक अवसायनात गेली. जिल्हा बँकेने दिलेले कर्ज वर्षानुवर्ष वाढत गेले. ३१ मार्च २०१९ अखेर व्याजासह हा आकडा आता १० कोटी ९२ लाख ३८ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँक बंद झाल्यामुळे तत्कालीन संचालकांविरोधात बँकेने वसुलीचा दावा करत त्यांच्या खासगी मालमत्तेवर बँकेचे नाव लावण्याची कारवाई सुरू झाली आहे. या कारवाईला विभागीय सहनिबंधकांनी स्थगितीचे आदेश दिले. सहनिबंधकांनी घातलेला खोडा काढण्यासाठी बँकेने न्यायालयात अपील दाखल केले असून येत्या २८ मे रोजी सुनावणी होणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जिल्हा बँकेला ही वसुली करणे शक्य होईल, असे सध्यातरी दिसत नाही.

संचालक मंडळ

अरुण जोशी, विजय (नाना) बळवंत पाटील, जगदीश डागा, प्रमोद भार्गवे, मुकुंद कोकीळ, हरजीतसिंग आनंद, संजय पाटील, राजेंद्र बागमार, अमर कलंत्री, भाऊसाहेब मोरे, अरविंद वर्टी, सुहास शुक्ला, लक्ष्मण धोत्रे, शिवाजी निमसे, कांतीभाई पटेल, मधुकर भालेराव, श्रेयसी रहाळकर, वर्षा बस्ते.

बोलके आकडे

१०.९२ : कोटींचे कर्ज
१९ : संचालक मंडळ
०१: संचालकाचा मृत्यू
२००२-०३ : बँक अवसायनात

First Published on: May 10, 2019 11:59 PM
Exit mobile version