सख्ख्या बहीणींनी शासकीय नोकरीचे आमिष दाखवून घातला तरुणांना गंडा

सख्ख्या बहीणींनी शासकीय नोकरीचे आमिष दाखवून घातला तरुणांना गंडा

नाशिक : शासकीय नोकरीचे स्वप्ने पाहणार्‍या तरुणांना दोन सख्ख्या बहिनींनी गंडा घातला. जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरुपी नोकरी लावून देतो असे सांगून या बहिनींनी सोळा तरुणांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित दोन्ही बहिणींविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अरबाज सलिम खान (२४, रा. खडकाळी) या तरुणाने भद्रकाली पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दिली आहे.

अरबाजच्या फिर्यादीनुसार, संशयित फरिन जुल्फेकार शेख आणि जकीय जुल्फेकार शेख (दोन्ही रा. अजमेरी मशिदीजवळ, नाईकवाडीपुरा) यांनी फेब्रुवारी २२२२ पासून गंडा घातला. दोघींनी जिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी नोकरी लावून देतो असे सांगून अरबाजसह इतर तरुणांना आमीष दाखवले. रुग्णालयातील वरिष्ठांपर्यंत ओळख असून, काहींना रुग्णालयातही नेले. तिथे वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या पोशाखात फिरून कुठे काय काम चालते, हे दाखवले. तरुणांचा विश्वास संपादन करुन संशयित बहिणींनी अरबाजसह इतरांकडून एक लाख २८ हजार रुपये घेतले. मात्र, कोणालाही जिल्हा रुग्णालयात नोकरी मिळाली नाही. अरबाज यांच्यासह इतर पंधरा तरुणांना बहिणींनी गंडा घातल्याचे समजते. त्यानुसार भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघींपैकी एक खासगी कंपनीत कामास असून, दुसरी घरीच असते. दोघीही वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या वेशात जिल्हा रुग्णालयात फिरायच्या. त्यामुळे या घटनेने पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

First Published on: October 13, 2022 11:58 AM
Exit mobile version