जिल्हा बँकेत ‘कंत्राटी’ कर्मचाऱ्यांचा ठिय्या

जिल्हा बँकेत ‘कंत्राटी’ कर्मचाऱ्यांचा ठिय्या

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २०१६ मध्ये कंत्रीटी पद्धतीने नेमणूक केलेल्या ३७२ कर्मचार्‍यांनी जिल्हा बँकेतील अधिकारी व वकीलांवर फसवणुकीचा आरोप करत सीबीएस येथील मुख्यालयात सोमवारी (दि.20) ठिय्या आंदोलन केले. संतप्त झालेले हे कर्मचारी मंगळवारी पुन्हा बँकेचे प्रशासक व अधिकार्‍यांना घेराव घालणार
असल्याचे समजते.

जिल्हा बँकेच्या तात्पुरत्या कर्मचार्‍यांच्या विरोधात न्यायालयाचा निकाल गेल्यानंतर जिल्हा बँकेनेही या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडल्याची या कर्मचार्‍यांची भावना झाली आहे. हे तात्पुरते कर्मचारी २०१६ पासून जिल्हा बँकेत अल्पवेतनावर काम करीत आहेत. कोव्हिड १९ च्या महामारीच्या काळातही त्यांनी बँकेत नियमित सेवा बजावली. दरम्यान या कर्मचार्‍यांची भरती करताना सहकारी विभागाच्या नियमांचे पालन न करण्यात आल्यामुळे जिल्हा औद्योगिक न्यायालयाने या कर्मचार्‍यांची कायम करण्याची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. या निकालामुळे तात्पुरत्या स्वरुपात काम करणार्‍या या कर्मचार्‍यांमध्ये बँक प्रशासन व बँकेच्या वतीने न्यायालयात खटला लढणार्‍या वकिलांविषयी नाराजी निर्माण झाली आहे.

या अधिकार्‍यांनी व वकिलांच्या पॅनलवर आमच्याकडून फीच्या नावाखाली वारंवार पैसे घेतले. तसेच निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याची खोटी आशा दाखवली, अशी या कर्मचार्‍यांची तक्रार आहे. यामुळे दाद मागण्यासाठी या ३७२ तात्पुरत्या कर्मचार्‍यांनी अचानकपणे जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीत प्रवेश करून कर्मचारी, ग्राहक यांचा रस्ता रोखून धरला. जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन केले. मात्र, बँक प्रशासक व वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी मंगळवारी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वयात कोठेही नवीन नोकरी मिळण्याची शक्यता नाही. तसेच अल्पमानधनातून उदरनिर्वाह होणे अशक्य होत असल्याने कर्मचारी जीवाचे बरेवाईट करू शकतात. त्यासाठी प्रशासन अधिकारी व वकिल पॅनल जबाबदार असल्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे.

First Published on: June 21, 2022 12:49 PM
Exit mobile version