जिल्ह्यात साडेसहा लाख डोस पडून

जिल्ह्यात साडेसहा लाख डोस पडून

नाशिक : राज्यातील कोरोना निर्बंध शिथील झालेले असले तरी नाशिक जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्यामुळे अजूनही निर्बंध शिथील झालेले नाहीत. लसीकरणाचा वेग मंदावल्याने जिल्ह्यात सहा लाख 57 हजार डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यात 15 वर्षावरील 55 लाख 79 हजार तर नागरिकांचे लसीकरणाचे टार्गेट केंद्र सरकारने दिले आहे. त्यापैकी 46 लाख 900 तरुणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 18 वर्षावरील 51 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचा लक्षांत दिलेला असताना 44 लाख 62 हजार (86.22 टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात एकूण लसीकरण 87 टक्के झालेले दिसत असले तरी मालेगाव शहरात सर्वात कमी लोकांनी लस घेतली आहे. सात लाख लोकसंख्येच्या या शहरातील अवघे 3 लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या आकडेवारीवर परिणाम झाल्याचे दिसून येते.

या तुलनेत नाशिक तालुक्यात 93.25 टक्के, दिंडोरी 90.76 टक्के, इगतपुरी 90.63 टक्के आणि देवळा तालुक्यातील 90 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेण्यातही या तालुक्यांची आघाडी असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येते. या तुलनेत नांदगाव, सुरगाणा, कळवण, पेठ या तालुक्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे दिसून येते. लसीकरणाचा वेग मंदावल्याने कोव्हॅक्सिनचे 6 लाख डोस तर कोविशिल्डचे 61 हजार डोस शिल्लक आहेत. नागरिकांनी मागणी केल्यास त्या ठिकाणी त्यांना डोस उपलब्ध करुन दिला जात आहे.

43 हजार नागरिकांना बुस्टर डोस

जिल्ह्यातील तब्बल 43 हजार 114 नागरिकांनी आजपर्यंत बुस्टर डोस घेतला आहे. यात 33 हजार 932 नाशिक शहरातील तर 3737 मालेगाव शहरातील आहेत.

जिल्ह्यात एक लाख 45 हजार लोकसंख्या जास्त

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील लोकसंख्या 45 लाख गृहित धरली आहे. प्रत्यक्षात एक लाख 45 हजार लोकसंख्या ही अतिरीक्त असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. ही लोकसंख्या कमी करण्याची विनंती आरोग्य विभागाने केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, यात कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे लसीकरणाचा लक्षांक गाठणे आरोग्य विभागाला कठीण जात आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही लोक शहरात राहतात. त्यांनी कोठे डोस घेतला याची पडताळणी केली जात आहे. संपूर्ण जिल्ह्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नाशिकचा आकडा निश्चितपणे वाढेल.
– डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, नाशिक

First Published on: March 4, 2022 8:45 AM
Exit mobile version