मनमाडला तब्बल ३ महिन्यांनंतर लालपरी रस्त्यावर

मनमाडला तब्बल ३ महिन्यांनंतर लालपरी रस्त्यावर

मनमाड : मनमाड आगारातून 4 एसटी बसेस सुरु होताच त्यातून एक एसटी मनमाड-नांदगाव दरम्यान शाळेच्या वेळेत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, तब्बल तीन महिन्यांनंतर एसटी हिसवळ खुर्दच्या चौफुलीवर येताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून आरती केली. यावेळी पालक आणि ग्रामस्थांनी एसटी चालक आणि कंडक्टरचे शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. आता कधीही एसटी बंद करू नका अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी केली.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कामगार संपावर आहे. त्यामुळे मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातील एसटी सेवा ठप्प झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसोबत विद्यार्थ्यांनाही बसत होता. शहरापासून गाव, खेडा, वाड्यावस्त्या आणि छोट्या गावातील गोरगरीबांसाठी वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन एसटी आहे. मात्र एसटी बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची एका प्रकारे कुचंबना होऊ लागली होती. शाळेत जाण्यासाठी ही मुले-मुली रस्त्यावर येवून जीव धोक्यात घालत येणार्‍या-जाणार्‍या खासगी वाहनांना हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न करतात.

काही वाहने थांबून दोन-चार विद्यार्थ्यांना घेऊन जातात. तासन्तास कसरत करून देखील वाहने नाही थांबली तर घरी परत जाण्याची वेळ या विद्यार्थ्यावर येत होती. मात्र आता खासगी चालकाच्या माध्यमातून मनमाड आगारातून 4 एसटी बस सुरु करण्यात आल्या असून त्यातून एक एसटी मनमाड-नांदगाव दरम्यान शाळेच्या वेळेत सुरु करण्यात आली आहे. एसटी सुरु झाल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, चेअरमन विलास आहेर, पुंजाराम आहेर, आप्पासाहेब आहेर, पोपटराव आहेर, ग्रा.पं. सदस्य नानासाहेब आहेर, गोविंद आहेर, संदीप कदम, संदिप आहेर, लखन आहेर, शांताराम लोखंडे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

First Published on: February 5, 2022 8:35 AM
Exit mobile version