उदासिनतेमुळे थांबलेला ६६० मेगावॅट प्रकल्प सुरु करा – आ. अहिरे

उदासिनतेमुळे थांबलेला ६६० मेगावॅट प्रकल्प सुरु करा – आ. अहिरे

नाशिक : एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतांना वीज निर्मिती कंपनीकडून उदासीनता दाखवली जात आहे, वीज उत्पादनाचा खर्च अधिकारी व प्रशासनाकडून जाणिवपुर्वक जास्त दाखवला जात असून प्रलंबित मंजूर ६६० मेगावॅट प्रकल्प त्वरीत सुरु करावा असा प्रश्न आमदार सरोज आहिरे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केल्याने प्रकल्पावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ९७ अधिका-यांची पदे रद्द करण्याची कार्यवाही त्वरीत थांबवण्याची मागणी केली आहे.

देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी हिवाळी अधिवेशनात एकलहरे प्रकल्पाबाबत आवाज उठवला आहे, शुक्रवारी (दि. २४) आहिरेंनी उर्जा विभागातील अधिकारी व प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत एकलहरे येथील मंजूर असलेला ६६० मेगावॅट प्रकल्प सुरु करण्याची मागणी केली.

नवीन प्रकल्पासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतांना प्रशासन दुर्लक्ष करत आहे, याठिकाणी रेल्वेमार्ग, ६५० एकर जागा, प्रशासकीय इमारती, कामगार वसाहत, राख साठवणूक बंधारा, पाणी, आदी सर्व सुविधा उपलब्ध आहेत, राज्यातील अव्वल स्थानी असलेल्या वीज निर्मिती केंद्रांपैकी एकलहरे प्रकल्प एक असून याठिकाणचे जुन्या संचापैकी दोन संच २०११ साली बंद करण्यात आले, उर्वरीत तीन संच चांगल्या अवस्थेत सुरु आहेत, शासनाने याठिकाणी मंजूर असलेला ६६० मेगावॅट प्रकल्प त्वरित सुरु करावा अशी मागणी केल्याने अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

त्या ९७ पदांचा निर्णय रद्द करा..

येथील संच बंद करण्यात आल्यानंतर आता थेट ९७ अधिका-यांची पदे रद्द करण्याचा निर्णय वीज निर्मिती कंपनीने घेतल्याने एकलहरे प्रकल्पाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार सरोज आहिरेंनी सदर निर्णय रद्द करण्याची मागणी केल्याने अधिकारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: December 26, 2021 5:40 PM
Exit mobile version