अजब कारभार; चक्क भरपावसात डांबरीकरण

अजब कारभार; चक्क भरपावसात डांबरीकरण

नवीन नाशिक : डांबर आणि पाणी यांचा छत्तीसचा आकडा असतानाही सिटी सेंटर मॉल चौकात महापालिकेच्या एका ठेकेदाराने भरपावसात मध्यरात्री डांबरीकरणाचा अचाट प्रयोग केला. या डांबरीकरणानंतर काही तासांतच अनेक ठिकाणचे डांबर उखडून गेल्याने पालिका प्रशासन संबंधित ठेकेदाराविरुद्ध काय कारवाई करणार, असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक शहरासह संपूर्ण राज्यातच रस्त्यांची दुर्दशा झाल्याची ओरड सुरू आहे,त्यातच गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकिंच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेकडून रस्त्यांच्या दुरुस्ती व डागडुजीचे काम सुरू आहे. मात्र ज्या पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली त्याच पावसात रस्ता दुरुस्ती सुरू असल्याचा अजब प्रकार सिटी सेंटर मॉल सिग्नल चौकात झाला असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे मंगळवारी मध्यरात्री १२ वा. दरम्यान सीटी सेंटर मॉल चौकात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होते. मात्र त्यावेळी जोरदार पाऊस झालेला होता. रस्ते कामगार रस्त्यावरील पाणी खराट्याने झाडून त्यावर डांबर ओतत असल्याचे निदर्शनास आले. रस्त्यावर पाणी असताना रस्त्यावर डांबराचे थर टाकण्याचा प्रकार अंधारात सुरू होता. विशेष म्हणजे यावेळी तेथे पालिकेचा एकही अधिकारीही उपस्थित नव्हता. दरम्यान, याबाबत शिवसेना पदाधिकारी पवन मटाले यांनी ठेकेदाराच्या कामावरील सुपरवायझरकडे विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरत उडवाउडवीची उत्तरे दिली.

अंधारात भर पावसात रस्त्यावरील पाण्यावर डांबर टाकून डांबरीकरण करण्याचा उद्योग कोणत्या हेतूने सुरू होता, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मंगळवारी मध्यरात्री केलेला रस्ता तयार करून २४ तासही झालेले नसतांना बुधवारी दुपारपर्यंत त्याच्यावरील डांबरीकरण उखडून गेल्याचे निदर्शनास आल्याने निव्वळ काम केल्याचा देखावा करण्यासाठी आणि भरमसाठ बिले वसूल करण्यासाठीच असे प्रकार केले जातात का? यासंदर्भात महापालिकेकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे मटाले यांनी सांगितले.

First Published on: September 8, 2022 12:54 PM
Exit mobile version