महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

राज्यातील महसूल कर्मचार्‍यांनी महसूल दिनापासून सुरू केलेल्या संपावर तोडगा न निघाल्याने महसूल कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. मागच्या पाच वर्षात राज्य शासनाने १९ मागण्यांपैकी एकाही मागणीचा विचार न केल्याने महसूल कर्मचारयांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे महसूली कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. त्यामुळे कार्यालयात काम घेऊन येणार्‍यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

महसूल कर्मचार्‍यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच तहसील कार्यालयातील कामकाज थंडावले होते. वर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्‍यांच्या संपामुळे केवळ जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, आणि उपजिल्हाधिकारी काम करत होते. अंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवणे, महसूल सहायक पदनाम करणे, लोकसेवा भरतीत पाच टक्के जागा राखीव ठेवणे या प्रमुख मागण्यांसह १६ मागण्यांसाठी राज्यातील महसूल कर्मचारयांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आजपासून नाशिकसह राज्यातील सर्वच तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे महसूल विभागात काम घेऊन येणार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जिल्हा तसेच तहसील कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी येणार्‍या नागरिकांना या संपामुळे माघारी परतावे लागले. काही ठिकाणी अधिकारी उपस्थित होते; पण हाताखालील कर्मचारी नसल्याने काम होणार नसल्याचे सांगितले गेले. महसूल कर्मचार्‍यांच्या संपाची पूर्वकल्पना ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना नसल्याने तालुकास्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांना या संपाचा नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, या वेळी नागरिकांना होत असलेल्या मनस्तापाबद्दल कर्मचारी संघटनेतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली. प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी महसूल कर्मचारी संघटना गेली चार वर्षे सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे; परंतु, अजूनही बहुतांश मागण्या मान्य झालेल्या नाहीत. वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये शासनाने मागण्या तत्त्वत: मान्य केलेल्या आहेत; परंतु आजपर्यंत कोणताही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही.

शासनाने महसूल कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतचे शासन निर्णय निर्गमित करावेत, अशी मागणी यावेळी महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी संघटनेच्यावतीने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आंदोलन करण्यात येउन शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी गणेश लिलके, दिनेश वाघ, पी.वाय.देशपांडे, पी.आर.सोनवणे, पी.डी.गोंडाळे, अरूण तांबे, ज्ञानेश्वर कासार, वंदना महाले, रा.ना.पर्वते, संतोष तांदळे, टी.डब्ल्यू महाले आदिंसह महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.

संपात सहभागी जिल्हयातील कर्मचारी

First Published on: September 5, 2019 11:54 PM
Exit mobile version