तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित

तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित

कामात कसूर केल्याप्रकरणी ग्रामपंचायत विभागाने तीन ग्रामसेवकांचे तडकाफडकी निलंबन केले. कामकाजात अनियमता, कर्तव्यात कसूर अशा कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील वादग्रस्त ग्रामसेवकांसह अन्य दोघांचा यात समावेश आहे.ग्रामपंचायत विभागाने या तिन्ही ग्रामसेवकांचे निलंबनाचे आदेश काढले आहे. यात सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील सुभाष अहिरे यांचा समावेश आहे.

नांदुर शिंगोटे येथे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शौचालय योजनेस पात्र असलेल्या कुटुंबाच्या यादीमध्ये हयात लाभार्थींना मयत, दुबार, स्थलांतरित दाखवून अनुदानास अपात्र ठेवल्याची तक्रार अहिरे यांच्याविरोधात होती. या तक्रारींवरून गटविकास अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून अहवाल मागवण्यात आला होता. यात, अहिरे यांनी शासनाची व वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभूल करून लाभार्थी यादीची खात्री न करता सचिवपदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील भास्कर भिका गावित यांच्या चौकशी अहवालात 15 व्या वित्त आयोगाचा निधीतील 6 लाख 59 हजार रूपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील शशिकांता जावजी बेडसे यांच्यावर विविध दोषारोप करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींच्या विविध योजनांचे बँक खाते सही नमुने न बदलणे, सभेला गैरहजर राहणे, सभेचा अहवाल सादर न करणे, कोविड लसीकरण मोहीमेस गैरहजर राहणे दप्तर उपलब्ध करून न देणे आदी कारणांमुळे बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

First Published on: September 5, 2021 11:30 PM
Exit mobile version