पालिकेची महासभा कालिदास कलामंदिरात घ्या

पालिकेची महासभा कालिदास कलामंदिरात घ्या

महापालिकेची महासभा ऑनलाईन होत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. शहर विकासासंदर्भातील धोरणात्मक विषय परस्पर मार्गी लागत असल्याने सत्ताधार्‍यांकडून गैरकारभाराला खतपाणी मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला असून महासभा कालिदास कलामंदिरात येथे सदस्यांच्या उपस्थितीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त जाधव यांच्याकडे केली.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा वर्षभरापासून प्रत्यक्ष सभागृहात न होता ऑनलाईन पध्दतीने होत आहे. या सभेबाबत अनेक प्रतिकूल बाबी निदर्शनास येत आहेत. अनेक वेळेला नेटवर्क नसणे, सभासदांची भूमिका महापौर तसेच आयुक्त व विभागप्रमुख व अन्य सदस्य यांच्याकडे तांत्रिक अडचणींमुळे न पोचणे, आवाज मधूनच गायब होणे आदी बाबी तर आहेच, याचबरोबर अनेक वेळेला सत्ताधारी पक्षाकडून या तांत्रिक अडचणीचा गैरफायदा घेवून अनेक महत्वांच्या विषयांवर साधक बाधक चर्चा न होवू न देता परस्पर विषय मंजूर केले जात आहे तर अनेक वेळेला सभा देखील थोडक्यात गुंडाळली जात आहे. कोविडचे संकट हीच संधी सत्ताधारी पक्ष बाळगत असल्यामुळे अनेक गैरकाराभाराला निमंत्रण मिळत असल्याची आमची व शहरातील सर्वसामान्य नागरीकांची भूमिका आहे.

महाकवी कालिदास कलामंदिर मोठे व अद्ययावत आहे. सभागृहाची क्षमता ही सुमारे 682 आसनांची आहे. या सभागृहात सर्वसाधारण सभा घेतली गेल्यास मनपाचे 127 नगरसेवक, खातेप्रमुख व अत्यावश्यक कर्मचारी विचारात घेता साधारणत: 250 लोकांमध्ये ही सभा योग्य ते सामाजिक अंतर पाळून चांगल्या प्रकारे घेतले जावू शकते अशी आमची भूमिका आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीला अवघे 6 महिने बाकी आहेत. अशा परिस्थितीत सर्वच लोकप्रतिनिधींना आपआपल्या प्रभागातील विकास कामांची घाई आहे व प्रभागातील समस्यांबाबत महासभेपुढे आपली भूमिका मांडणे देखील तितकीच गरजेची वाटत आहे त्यामुळे याबाबत उचित कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी बोरस्ते, शिंदे यांनी केली आहे.

First Published on: June 22, 2021 2:00 PM
Exit mobile version