माझ्यासोबत बोलत जा नाहीतर तुझी बदनामी करीन; भरदिवसा तरुणीचा विनयभंग

माझ्यासोबत बोलत जा नाहीतर तुझी बदनामी करीन; भरदिवसा तरुणीचा विनयभंग

तरुणीने बोलावे, यासाठी एकाने तिचा वर्षभर पाठलाग केला. तिच्या फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर बारकाईने लक्ष ठेवले. तरुणीने त्याला समजवण्यासाठी बोलवले असता त्याने संधी असल्याचे समजून तिचा भरदिवास विनयभंग केला. माझ्यासोबत बोलत जा नाहीतर तुझी बदनामी करीन, असे म्हणत त्याने तरुणीला भावनिक ब्लॅकबेल केले. ही घटना पंचवटीतील निमाणी बसस्थानकाजवळ घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी रितेश अप्पा पवाल-पाटील (२५, रा.राणीचे बाबंरुड, ता.पाचोरा, जि.जळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीने बोलावे, यासाठी एक मार्च २०१९ ते १६ फेब्रुवारी २०२० या कालावधीत रितेश पवाल-पाटील याने प्रयत्न केले. तू माझ्यासोबत बोलत जा अन्यथा मी तुझी बदनामी करीन, असे संदेश त्याने तिला मोबाईलवर पाठविला. तिच्या फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल, स्टेट्सवर तो सतत लक्ष ठेवायचा. तो तरुणीचा सारखा चोरुन पाठलाग करायचा. ही बाब तरुणीच्या लक्षात आली असता तिने त्याला रविवारी (दि.१६) समजवण्यासाठी बोलवले. मात्र, त्याने संधी असल्याचे समजून तिला भेटण्यासाठी लगेच तरुणीने सांगितलेल्या ठिकाणी निमाणी बसस्थानकाजवळ आला. तिच्या जवळ येत ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही’, असे म्हणत त्याने तरुणीचा हात पकडला. ‘लग्न केले नाहीतर जीवाचे बरेवाईट करुन घेईन’, असे म्हणत त्याने तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्यानंतर त्याने रविवारी भरदिवसा तिच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करत विनयभंग केला. त्याच्या अनपेक्षित कृत्याने भयभीत झालेल्या तरुणीने मदतीसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात येत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. सी. कासर्ले करत आहेत.

First Published on: February 17, 2020 1:08 PM
Exit mobile version