अमित ठाकरेंचा दौरा सुरू असतांनाचा पडझड

अमित ठाकरेंचा दौरा सुरू असतांनाचा पडझड

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे दोन दिवसीय संघटनात्मक बांधणीसाठी नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. मात्र, या दौर्‍याला पक्षातील पडझडीचा अपशकुन झाला आहे. माजी नगरसेविका मेघा साळवे, विभागध्यक्ष नितिन साळवे, विक्रम कदम यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची वाट धरली आहे. दरम्यान, अमित ठाकरे यांनी दिवसभर पक्ष कार्यालयात तळ ठोकत शाखाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर तसेच जिल्हाभरातील पदाधिकार्‍यांशी वन टू वन संवाद साधला.

अमित ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी अश्याच पद्धतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दौरा करत विद्यार्थी-विद्यार्थिणींच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांनी पक्षाची मुख्य वाहिनी सोबतच मनविसेच्याही पदाधिकारी कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट प्रस्थापित केला आहे.

अमित ठाकरे यांचे मंगळवारी (दी.२७) सकाळी ९:३० वाजताच नाशकात आगमन झाले. त्यानंतर ११ वाजेपासून पहिल्या सत्रात त्यांनी सलग पंचवटी आणि मध्य-नाशिक येथील शाखाध्यक्षांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या दुसर्‍या सत्रात त्यांनी मनविसेच्या शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहरातील काही शाखाध्यक्षांनी दांडी मारली असली तरी ग्रामीण भागातून विशेष प्रतिसाद मिळाल्याने दुसरे सत्र सायंकाळी उशिरा ८ वाजेपर्यंत सुरू होते.

पडझडी सुरूच

अमित ठाकरे यांच्या दौर्‍याकडे संघटना बांधणीसोबतच पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी म्हणूनही बघितले जात असताना. पक्ष स्थापणेपासून सोबत असलेले कुटुंब तसेच पक्षातील दिग्गज नेते गेल्यावर तसेच त्याकाळात उमेदवारीची ऑफर असताना पक्षाशी एकनिष्ट राहिलेले माजी नगरसेविका मेघा साळवे, विभागध्यक्ष नितिन साळवे यांच्यासह नाशिकरोड येथील विभागाध्यक्ष विक्रम कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेत बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे.

आज कार्यालयांचे उद्घाटन 

अमित ठाकरे यांच्या दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी ते शहरातील काही संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करतील तसेच उर्वरित नाशिकरोड, सिडको, सातपुर विभागातील शाखाध्यक्षांशी संवाद साधतील.

नाशकातही नागपूर, सिधुदुर्ग पॅटर्नची चर्चा

मनसेच्या नागपूर तसेच सिधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यकारणीत मोठ्या प्रमाणात बेवानव तसेच गटबाजी वाढल्याने राज ठाकरे यांनी आपल्या स्वभावानुसार ‘एक घाव दोन तुकडे’ करत कठोर निर्णय घेतला होता. दरम्यान, राज ठाकरे नवीन वर्षात नाशिक दौर्‍यावर येण्याची शक्यता आहे. परंतु, त्याधीच ते नाशिक बाबतही काहीतरी कठोर निर्णय घेतील आणि नागपूर, सिधुदुर्ग पॅटर्न राबवतील की काय अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.

First Published on: December 28, 2022 10:20 AM
Exit mobile version