१० पैशांत भेळ अन् मॅटिनी चित्रपटांची क्रेझ

१० पैशांत भेळ अन् मॅटिनी चित्रपटांची क्रेझ

नाशिकला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर इतिहास आहे. नाशिक अर्थात गुलशनाबाद शहराच्या इतिहासाचा हा वैभवशाली खजिना नाशिक जिल्हा न्यायालयाचे निवृत्त सहायक अधीक्षक श्रीराम शिंगणे यांच्या लेखांद्वारे प्रसिद्ध करत आहोत. शहराच्या चौकांतील धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नाशिकला वैभवाप्रत नेण्यासाठी या चौकातील काही मान्यवरांची माहितीही या मालिकेतून प्रसिद्ध करत आहोत…

पन्नास वर्षांपूर्वी नाशिकमध्ये प्रत्येक चित्रपटाची क्रेझ असायची. मॅटिनीला लागलेले चित्रपट म्हणजे हमखास शाळेला टप्पा मारून बघणे. मॅटिनीला रेग्युलर होऊन गेलेले चित्रपट यायचे. त्या काळात तिकिटांचा काळाबाजार तेजीत असायचा. मॅटिनीला मात्र, कमी रेटने काळ्याबाजारातील तिकीट मिळायचे. त्या काळी ब्लॅकने तिकीट घेऊन मॅटिनीला चित्रपट पाहण्याची एक वेगळीच क्रेझ असायची. ही ब्लॅक करणारी मंडळी शरीराच्या कोणत्याही भागात तिकिटे लपवत असत. आमच्या वर्गात घारपुरे नावाचा एक मुलगा होता. हा चांगला दांडगट, घारे डोळे, पाऊणेसहा फूट उंचीचा आमच्यापेक्षा सहा सात वर्षांनी मोठा होता. तो वर्गाचा मॉनिटरही होता. तो ब्लॅकने तिकिटे विकायचा. कधी मधुकर तर कधी चित्रमंदिर टॉकीजवर डोअरकिपर म्हणून काम करत. त्याकाळी तिकिटांचा काळाबाजार करणारी एक महिलासुद्धा होती. ती मामी नावाने प्रसिद्ध होती. इंटरव्हलला शेंगदाणे किंवा तळलेला बटाटेवडा चित्रमंदिर मधुकर थिएटरला मिळायचा. दे मार चित्रपट असला की काही बाया-बापड्यांना फारच स्फूर्ती येत. मार मेल्याला अजून मार, मुलींची अब्रू घेतो मेला, असे शब्द हमखास कानी पडायचे.

एखादया भावनाशील प्रसंगात हळहळ व्यक्त करताना त्या रडायच्यासुद्धा. सुपरहिट गाण्यावेळी काचेचे ग्लास, कपबशी, सुटी नाणी फेकून रसिक आपला दर्दीपणा सिद्ध करत असत. मेहेर सिग्नलसमोर गारवा नावाचे आईस्क्रिम पार्लर होते. या दुकानाचे मालक मंगेश बकरे व बकरे मंडपवाला हे आमच्या वर्गात होते. त्याकाळी बकरे मंडप आणि गारवा आईस्क्रिम दोन्ही प्रसिद्ध होते. सीबीएसच्या पुढे चौकात हॉटेल माझदा होते. तिथे किस्मत बाग व त्यासमोर मुस्लिम वस्ती. तेथील हॉटेल मालक उकडलेले बटाटे, तिखट मीठ लावून विकत असे. तसेच अंडी, कोंबड्या, बदके विकत असे. माझदा हॉटेलजवळील जुने चर्च परिसरात रविवारी जत्रा असायची. हे चर्च नारायण टिळक यांनी सुरू केले, अशी वदंता होती. या चर्चजवळ सुरगाण्याचे राजे धैर्यशीलराव पवार यांचा बंगला होता. बंगल्यात मोठा थोरला कुत्रा आणि कर्कश्य आवाज करणारा पांढरा काकाकुवा पक्षी होता. पवार यांच्या बाजूला साफल्य नावाचा बंगला व त्या पाठीमागे काशिनाथ घाणेकर यांचे लोभस व रुबाबदार व्यक्तीमत्व असलेले मोठे बंधू राहत होते. या चर्चजवळील रेव्हरंड टिळक लायब्ररी अजूनही आहे. त्या काळी फादर फॉरेनचे पोस्टल तिकिटे आणि येशूचे पुस्तके वाचायला देत असत. पुढे रस्त्याच्या दुतर्फा मोठे वटवृक्ष होते. ५० वर्षांपूर्वी कालिका माता मंदिराच्या अलीकडे ग. ज. म्हात्रे यांचा अवंती नामक बंगला होता. हा गावाबाहेरील एकमेव बंगला एखाद्या शिलेदारासारखा होता.

सीबीएसच्या दुसर्‍या टोकाला ढोल्या गणपती मंदिरातील मोदक खाणारा मतिमंद मुलगा दिसायचा. रविवार कारंजा येथे भेळपुरीवाला सिंधी प्रसिद्ध होता. बाजूलाच सानप बंधू यांचा भेळ भत्ता १० पैसे, २० पैसे अशा दरांनी मिळत असे. २० पैशांत पोटभर भेळ मिळायची. भिकुसा लेन येथे सुपात विड्या वळणार्‍या बायका दिसायच्या. नाशिकचे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे साईखेडकर. लोखंडी कॉट भाड्याने देण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आयुष्यभर केलेल्या या व्यवसायातून त्यांनी आपल्या वडिलांच्या नावे 1969 मध्ये एक लाख रुपयांची देणगी सार्वजनिक वाचनालयास दिली आणि सार्वजनिक नाट्यगृहाचे परशुराम साईखेडकर नाट्यगृह म्हणून प्रसिद्ध झाले. दुसरे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे आदर्श बेकरीचे संचालक मालक दिवंगत श्रीकृष्ण व सदाशिव धामणकर. हे दोघे बंधू स्वभावाने काहीसे तिरसट होते. मात्र, धंद्यात अतिशय सचोटी आणि प्रामाणिकपणा होता. त्यांचा त्या काळी आदर्श ब्रेड हा खरोखर आदर्श होता. त्यांनी एक मराठी उद्योजक म्हणून नाव कमावले. या दोघा बंधुंच्या पश्चात त्यांच्या वारस भगिनीने दिवंगत बंधूंच्या नावे पुणे विद्यार्थी गृह संस्थेस नाशिक येथे इंजिनीअरिंग कॉलेज स्थापन करण्यासाठी 1990 च्या दशकात सुमारे एक कोटी रुपयांची देणगी दिली.

तिसरे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे मोहन प्यारे. हे दरसाल गोदेच्या महापुरात व्हिक्टोरिया पुलावरून उड्या मारत असत. त्यांनी त्या काळात गोदावरी नदीपात्रात बुडणारे असंख्य जीव वाचवले. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते. झुबकेदार, अक्कडबाज मिशा, मध्यम उंची, झब्बा आणि लुंगी असा त्यांचा पेहराव असे. ते त्यांचे पंटर बरोबर घेऊन शहरातील मध्यवर्ती भागातून नेहमी फेरफटका मारत असत. आता यातील कोणीही नाही. काळाच्या प्रवाहात केव्हाच निघून गेलेली ही व्यक्तिमत्वे जुने प्रतिभावंत व आपापल्या क्षेत्रात दिग्गज होते, हे मात्र खरे!

First Published on: November 10, 2022 4:49 PM
Exit mobile version