पहिली ते चौथीच्या शाळा उघडणार मार्चमध्ये

पहिली ते चौथीच्या शाळा उघडणार मार्चमध्ये

नवीन वर्षात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्यानंतर आता इ.पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. मार्च व एप्रिल असे दोन महिने शाळा घेवून विद्यार्थ्यांना मे महिन्यात सुटी देण्याचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून संपूर्ण शाळा ‘लॉकडाऊन’ झालेल्या होत्या. अनलॉकची प्रक्रिया सुरु होताच नवीन वर्षात पहिल्या टप्प्यात इ.नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत यावे लागते. तसेच दररोज केवळ तीन तास शाळा भरवण्यात येत आहे. त्यानुसार साधारणत: 80 टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सांगितले. दुसर्‍या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाल्यानंतर आता तीसर्‍या टप्प्यात इ.पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्याचा नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. केवळ दोन महिने शाळा घेवून मे महिन्यात विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात येतील. त्यानंतर जूनमध्ये नियमितपणे शाळा सुरु करण्याचे नियोजन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर ठेवल्याचे बोलले जाते. त्यामुळे लवकरच शाळा सुरु होतील.

शिक्षण विभागाने इ.पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. त्यानुसार दोन महिने शाळा सुरु होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर महिनाभर सुट्या राहतील.
– राजीव म्हसकर,प्राथ.शिक्षणाधिकारी

First Published on: February 9, 2021 1:45 PM
Exit mobile version