रविवार पेठेत वाडा कोसळला; दोन महिला जखमी

रविवार पेठेत वाडा कोसळला; दोन महिला जखमी

रविवार पेठेतील देवधर लेनमधील वैश्य वाडा शनिवारी (दि.३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसर्‍या मजल्यावरुन खाली सुरु असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या. त्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीता अजित वैश्य (वय ५५) व रिता अभिषेक वैश्य (वय २७) अशी जखमींची नावे आहेत.

रविवार पेठेत जुना वाडा पडल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ मातीच्या ढिगार्‍यातून दोन महिलांना सुखरुप बाहेर काढले. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, जवानांना एक पाच वर्षांच्या मुलगा आणि त्यांच्या वडिलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. या वाड्याच्या पाठीमागे संजय जोशी यांच्या वाड्याचे नुतनीकरणाचे काम सुरु होते. त्याचे हादरे वैश्य वाड्याला बसल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते. वाड्याशेजारील बांधकाम थांबवण्याबाबत व्यावसायिकाला वारंवार रहिवाशी सांगत होते. मात्र, त्यांनी रहिवाशांचे ऐकले नाही., असा आरोप वैश्य कुटुंबातील सदस्य विनोद खेमचंद वैश्य यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित बाधकाम व्यावसायिकावर कारवाई करावी, अशी मागणी वैश्य कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे.

First Published on: July 3, 2021 9:13 PM
Exit mobile version