महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, पवारांचा शब्द

महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, पवारांचा शब्द
कळवण : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्या दिवसापासून दररोज उठून सरकार आज पडणार, उद्या पडणार, अशा वल्गना होत आहे. बोलणार्‍यांना बोलू द्या, आम्हाला आमचं काम करू द्या, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील शेतकरी मेळाव्यानंतर रविवारी (दि.28) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून किती वेळा सरकार पाडण्याच्या वल्गना झाल्या. बोलणार्‍यांना बोलू द्या, आम्हाला आमचे काम करू द्या, असा सल्ला त्यांनी दिला. काहींनी तर हे सरकार चालणार की नाही, यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. देव पाण्यात बुडवले होते. मात्र, सरकार काम करते आहे. आम्ही शपथ घेतल्यानंतर कोरोना आला. अनेक जवळचे लोक गेले. आणखी एक नवीन विषाणू आला आहे. मी काल आढावा घेतला. मुख्यमंत्री घेत आहेत. माणूस आई-बापाच्या पोटी एकदाच जन्माला येतो. त्यामुळे काळजी घ्यायला हवी. कोरोना प्रतिबंधक लस घ्या. विकासकामे झाली नाहीत तरी आरोग्यासाठी सरकार म्हणून आम्ही कमी पडणार नाही, असा शब्दही पवार यांनी दिला.
याचवेळी पवारांनी आवाहन केले की, एसटी कर्मचार्‍यांनो, तुटण्यापर्यंत ताणू नका. राज्यासमोर एवढी नैसर्गिक संकटे असताना एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला. शरद पवारांनी त्यांच्या अनुभवानुसार मार्ग काढला. मात्र, तरीही हे आंदोलन काहींनी सुरुच ठेवले आहे, जे योग्य नाही. त्यामुळे, तुटेल इतके ताणू नका. एसटी गोरगरिबांची आहे. सरकार एक पाऊल मागे आले आहे. तुम्ही एक पाऊल मागे या. तुम्हीही महाराष्ट्राचे आहात. तुम्हालाही येथील परिस्थिती माहीत आहे. विलीनीकरणावर समिती केली आहे. तिचा निर्णय येऊ द्या.
First Published on: November 27, 2021 4:15 AM
Exit mobile version