महापालिकेच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला केली अमानुष मारहाण

महापालिकेच्या शिक्षकाने विद्यार्थ्याला केली अमानुष मारहाण

नाशिक : जेलरोड येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५६ मध्ये किरकोळ करणावरुन शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी मंगळवारी (दि.२८) कर्ण अशोक चांदूडे या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सबंधित शिक्षक व शाळेच्या मुख्यध्यापिकेस २४ तासांत खुलासा करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिशीव्दारे दिला आहे.

नाशिक महापालिका शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी केले जाणारे वर्तन अनेकदा चर्चेचा विषय ठरते. शाळा क्रमांक ५६ मधील शिक्षक चंद्रकांत गायकवाड गैरवर्तानामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. विद्यार्थ्याना मारहाण करणे, उध्दटपणे वागत अरेरावी करणे अशा अनेक तक्रारी गायकवाड यांच्याविरुद्ध पालकांनी केल्या आहेत. मंगळवारी (दि.२८) कर्ण व इतर मुलांमध्ये भांडण सुरु होते. ते सोडविण्याऐवजी गायकवाड यांनी कर्ण याला बेदम मारहाण केली. परिणामी, कर्णच्या गालावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. विशेष म्हणजे, हा प्रकार मुख्यध्यापिका मोहिते यांच्या दालन आवारात घडला. हे प्रकरण शिक्षणाधिकारी धनगर यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी शिक्षक गायकवाड व मुख्यध्यापिका हेमलता मोहिते यांना खुलासा करण्यास सांगत कारवाई का करु नये? असा जाब विचारला आहे.

विद्यार्थी मारहाणप्रकरणी मुख्यध्यापिका हेमलता प्रभाकर मोहिते व उपशिक्षक चंद्रकांत संतोष गायकवाड यांना नोटीस बजावली आहे. २४ तासात खुलासा प्राप्त न झाल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. : सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, नाशिक महापालिका

First Published on: March 29, 2023 12:39 PM
Exit mobile version