गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवणार्‍यांची पोलिसांनी काढली धिंड

गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवणार्‍यांची पोलिसांनी काढली धिंड

नाशिक : चारचाकी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार्‍यास सातपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या चार तासात अटक केली. ज्या ठिकाणी संशयितांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची पायी धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले.

सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेच्या परिसरात एकाच रात्री संशयित आरोपींनी चारचाकी वाहनांच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री वाहनांवर दगड फेकणारा सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याच्या या कृत्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी सातपूर पोलीस ठाण्याला निवेदन देऊन कारवाईची मागणी करतनाचा आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी जिजामाता शाळेच्या परिसरात राहणार्‍या आकाश निवृत्ती जगताप (22) या संशयीतास अटक करून त्याची सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट, कामगार भवन, जिजामाता विद्यालय, शिवनेरी चौक आदी परीसरातून धिंड काढली.

ज्या ठिकाणी त्याने वाहनांच्या काचा फोडल्या, त्या ठिकाणांची माहिती पोलिसांनी त्याच्याकडून घेतली. यावेळी सातपूर पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक सतीश घोटेकर, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, गोकुळ कासार, दीपक खरपडे, सागर गुंजाळ, संभाजी जाधव, माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

First Published on: January 20, 2023 1:41 PM
Exit mobile version