लासलगावी कांद्याला ३१०० रुपयांचा दर

लासलगावी कांद्याला ३१०० रुपयांचा दर

चाळीसगाव, नांदगाव, मालेगाव या भागात गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस पडल्याने तेथील नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर दक्षिणेकडील राज्यातही कांदा आवक मंदावल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने कांदा दराला कमाल ३१०१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत कांदा सरासरी दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून लासलगाव व परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे कांदा आवक मंदावली आहे. पुढील सणासुदीचा काळ बघता कांदा भावात आणखी वाढ होईल अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.

पश्चिम बंगाल, दिल्लीच्या बाजारपेठेत दक्षिण भारतातून पाठविलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच पावसामुळे राजस्थानसह दक्षिणेकडील भागात कांद्याचे नुकसान झाल्याने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली आहे. परिणामी, पाच दिवसांत कांद्याच्या भावाने क्विंटलला ११०० रुपयांनी उसळी घेतली.

चाळींमध्ये साठविलेल्या उन्हाळ कांद्याला भाव मिळेल की नाही, अशी स्थिती तयार झाली असताना, मागील पाच दिवसात कांदा भाव वाढत आहे. भावामध्ये जरी तेजी दिसत असली मात्र मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेला होता. बदलत्या वातावरणामुळे आणि जोरदार सुरू असलेल्या पावसाने कांद्याच्या वजनात आणि प्रतवारी मध्ये कमालीची घट झाल्याने वाढलेल्या भावाचा फायदा शेतकर्‍यांना होताना दिसत नाही.

सध्या जुना उन्हाळ कांदा जवळपास तीस टक्के शिल्लक आहे. परंतु खराब होण्याचे प्रमाण दरवर्षी-पेक्षा जास्त आहे. नवीन लाल कांद्याचे आगार नांदगाव, मालेगाव, सटाणा, साक्री, धुळे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन लागवड तसेच रोपांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी १०००, सरासरी २९७० तर जास्तीत जास्त ३१०१ रुपये क्विंटल भाव मिळाले.

परतीच्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.आज कांद्याला भाव जरी असला तरी कांदा वजन आणि प्रतवारिला फटका बसला आहे त्यामुळे भाव वाढीचा काही खुप फायदा होत आहे असे नाही.
– रामा भोसले, शेतकरी, गोंदेगाव

First Published on: October 2, 2021 7:46 PM
Exit mobile version