पोलिसांची तत्परता, त्यांनाच पडली महागात

पोलिसांची तत्परता, त्यांनाच पडली महागात

नाशिक : नवरा-बायकोचे जोरदार भांडण सुरू असून नवरा त्याच्या बायकोला मारहाण करत असल्याचा ‘कॉल’ ‘डायल ११२’ वर एका जागरूक नागरिकाने केला. यानंतर तत्काळ मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी त्या संशयित व्यक्तीला पोलिसांनी घराबाहेर बोलावून घेत माहिती विचारण्यास सुरुवात केली असता, त्याने जवळ पडलेला लाकडी दंडुका घेत दोघा पोलिसांना मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे असेलेली नोंदवही हिसकावून घेत तेथून पळ काढल्याची घटना रविवारी (दि.२४) मध्यरात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, वडाळा नाका परिसरातील रेणुकानगर भागात एका दाम्पत्यामध्ये रविवारी रात्री अडीच: वाजेच्या सुमारास कडाक्याचे भांडण सुरु होते. यावेळी संशयित हल्लखोर पती विकास मुकेश लाखे (रा.रेणुकानगर) हा त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. ही बाब आजूबाजूला राहणाऱ्या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आली. त्याने ‘डायल-११२’ फिरवून माहिती कळविली. काही मिनिटांतच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मदन यशवंत बेंडकुळे (४५) हे त्यांच्यासोबत पोलीस शिपाई नवनाथ उगले यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. या वेळी लाखे यास त्यांनी बाहेर बोलावून विचारपूस करण्यास सुरुवात केली. तसेच त्याची मूळ माहिती नोंदवहीत पोलीस कर्मचारी भरत असताना त्याने तेथे बाजूला पडलेला लाकडी दंडुका उचलून प्रथम बेंडकुळे यांच्या पाठीवर मारला. तसेच उगले हे त्याला धरण्यास धावले असता त्यांनाही त्याने दंडुक्याने मारहाण केली. तसेच नोंदवही हिसकावण्याचा प्रयत्न करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयित विकास हा घटनास्थळावरून पसार झाला. बेंडकुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित लाखेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.

First Published on: April 26, 2022 12:33 PM
Exit mobile version