कोल्हापूर कारागृहातून बाहेर येताच नाशकात घरफोडी

कोल्हापूर कारागृहातून बाहेर येताच नाशकात घरफोडी

कोल्हापूर कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या रेकॉर्डवरील अपंग असलेल्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराला सोलापूर व बारामतीत चोरलेल्या कारसह सोमवारी (दि.१६) नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून निरा (जि.पुणे) येथून अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने नाशिकमध्ये चोरीच्या कारमधून येवून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन कार जप्त केल्या आहेत. बबन सर्जेराव जाधव (४६, रा.चौधरवाडी, फलटण, जि.सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

चोरट्यांनी गणेश मार्केट, कोणार्कनगर, आडगाव शिवार येथील इकॉम एक्सप्रेस प्रा.लि.कंपनीच्या ऑफिसचे शटर तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी ऑफिसमधील लोखंडी तिजोरी, रोकड, डि.व्ही.आर असे एकूण सुमारे ४ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या युनीट एकने तपास सुरु केला. तपासात चोरट्यांनी इनोव्हा कारचा वापर केल्याचे व एकजण पायाने अपंग असून तो लंगडत कारमध्ये बसून पळून गेल्याचा उघडकीस आला. संशयित कार (एमएच ०१-पी.ए.-८२३६) चोरटे घोटी टोलनाका येथून शहराबाहेर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही कार चोरीची असल्याबाबत सोलापूर पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बबन सर्जेराव जाधव (४६, रा.चौधरवाडी, फलटण, जि.सातारा) हा काही दिवसांपुर्वीच कोल्हापूर कारागृहातून जामीनावर सुटला आला होता. तो सातारा जिल्ह्यातील असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानुसार पथक फलटणला गेले. त्याचा शोध घेवूनही तो सापडला नाही. पथकाने निरा शहरातील हॉटेल व लॉजेसची तपासणी करण्यास सुरुवात केली असता तो निरा बसस्थानकासमोरील त्रिमुर्ती लॉजमध्ये लपलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी सतीश बाळासाहेब चव्हाण (रा.निरा, ता.पुरंदर, जि.पुणे) याचेसोबत केल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी सोलापूरमध्ये चोरी केलेली इनोव्हा कार आणि बारामतीमध्ये चोरीच्या पैशातून खरेदी केलेली स्विफ्ट कार (एमएच १२-एचएफ-५६०२) जप्त केली.

गुन्हेगारावर राज्यभर गुन्हे दाखल

गुन्हेगार बबन जाधव याच्यावर यवत, हडपसर, विजापूरनाका, वाळुंज, शाहीपुरी, विश्रामबाग, सांगली, महाड, रायगड, बारामती, सासवड, चाकण, चिपळूण, फलटण, कराड, शिरवळ पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत.

First Published on: March 16, 2020 8:07 PM
Exit mobile version