“हर घर सावरकर” संकल्पनेच्या माध्यमातून शिंदे गटाचा हिंदुत्वाला धार देण्याचा प्रयत्न; महानाट्याचे आयोजन

“हर घर सावरकर” संकल्पनेच्या माध्यमातून शिंदे गटाचा हिंदुत्वाला धार देण्याचा प्रयत्न; महानाट्याचे आयोजन

नाशिक : शिवसेना वर्धापन दिनानिमित्त १९ जून ते १९ जुलै हा संपूर्ण महिना नाशिक शिवसेनेच्या वतीने भगवा महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या “हर घर सावरकर” संकल्पने अंतर्गत व उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत साहेबयांच्या पुढाकाराने स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ’सागरा प्राण तळमळला’ या नाट्यप्रयोगाचे विनामूल्य आयोजन रविवार दिनांक २५ जून रोजी दुपारी ३ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक येथे करण्यात आले आहे.

नाशिकचे सुपुत्र वि. दा. सावरकर व हिंदुत्व हे एक वेगळं नातं आहे. हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. यज्ञकुंडातील अग्निहोत्र ज्याप्रमाणे कायम प्रज्वलित राहते, त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करून ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही, हेही तितकेच खरे आहे.

या सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार घरोघरी पोहोचवणे या प्रामाणिक जाणिवेतून ही मोहीम सुरू आहे. सावरकर आणि हिंदुत्व फक्त एखाद्या प्रसंगापुरते – राजकारणासाठी वापर न करता एखादे व्रत घेतल्याप्रमाणे सावरकरांच्या विचारांचा जागर हा कायम सुरूच राहणार असून हे नाटक नशिककरांसाठी व सावरकर प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांनी दिली. ज्या सावरकर प्रेमींना या विनामूल्य नाटकाच्या प्रयोगाची तिकिटे पाहिजे असतील त्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर – जिल्हा, मायको सर्कल, त्रंबक रोड येथे संपर्क साधावा.

First Published on: June 24, 2023 3:25 PM
Exit mobile version