रखडलेल्या डांबकरणाला अखेर मुहूर्त सापडला

रखडलेल्या डांबकरणाला अखेर मुहूर्त सापडला

नाशिक । गेल्या आठ दिवसांपासून अर्धवट सोडलेले पंडीत कॉलनीतील डांबरीकरणाचे काम महापालिकेने अखेर गुढीपाडव्याचा मुहूर्तावर पूर्ण केले. अर्धवट सोडलेल्या कामामुळे दुचाकीचालकांना तारेवरची कसरत करावी लागली.

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दोन्ही लेन तशाच ठेवून मध्यभागी एकेरी डांबरीकरण करण्यात आले होते. दोन्ही बाजूला पार्किंग व मध्यभागी डांबरीकरण यामुळे दुचाकीचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. यासंदर्भात आपलं महानगरने सोमवारी (दि.८) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका अधिकार्‍यांच्या निर्देशानंतर संबंधित ठेकेदाराने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे काम पूर्ण केले. डांबरीकरणाची कामे करताना महापालिकेच्याच वेगवेगळ्या विभागांच्या प्रमुखांमध्ये समन्वय नसल्याचे वारंवार दिसून येते.

पार्किंगचे लाड पुरे; आता फूटपाथचा प्रश्न मार्गी लावा

महापालिकेचे विभागीय कार्यालय, विविध हॉस्पिटल्स, क्लासेस, महाविद्यालये आणि लहान-मोठे हॉटेल्स यामुळे मध्यवर्ती भागात असलेल्या पंडीत कॉलनीत दिवसभर वर्दळ कायम असते. विद्यार्थ्यांसह चाकरमाने व ग्रामीण भागातून आलेले बहुतांश नागरिक जुनी व नवीन पंडीत कॉलनीतील रस्त्यांचा वापर करतात. असे असतानाही महापालिकेने एवढ्या वर्षांत एकदाही फूटपाथ उभारण्याचा निर्णय घेतला नाही. पार्किंगची समस्या सोडविताना आलेले अपयश झाकण्यासाठी महापालिकेने रस्त्याकडेला अधिकृत पार्किंगची व्यवस्था करुन दिलेली आहे. परिणामी अरुंद झालेल्या या रस्त्यांवरुन नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. राजीव गांधी भवनापासून हाकेच्या अंतरावर अशी स्थिती असेल तर शहराच्या इतर भागांचा विचार न केलेला बरा. दुर्दैव म्हणजे येथील जुन्याजाणत्या लोकप्रतिनिधींनीही कधी फुटपाथसाठी प्रयत्न केले नाहीत.

First Published on: April 9, 2024 11:59 PM
Exit mobile version