वादळाने पोल्ट्री शेड कोसळले; अडीच हजार कोंबड्यांचा मृत्यू

वादळाने पोल्ट्री शेड कोसळले; अडीच हजार कोंबड्यांचा मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील खेड गावातील शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक चंद्रकांत वाजे यांचे पोल्ट्रीचे शेड जोरदार वादळी वारा व पावसामुळे कोसळून तब्बल अडीच हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी पोल्ट्रीची देखरेख करणारा चंद्रकांत वाजे यांचा भाचा प्रसंगावधान दाखवत बाहेर पडल्याने बालंबाल बचावला.

शेतकरी चंद्रकांत वाजे यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्या मळ्यात १०० बाय ३० चे पोल्ट्री शेड बांधले होते. त्यामध्ये तीन हजार ब्रॉयलर कोंबड्या होत्या. या कोंबड्या दोन ते तीन दिवसांत बाजारात विकण्यासाठी पाठवल्या जाणार होत्या. मात्र, वादळी वार्‍याने भिंती व शेडचे लोखंडी अँगल, पत्रे कोंबड्यावर कोसळल्याने त्याखाली दबून सर्व कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यात वाजे यांचे लाखोंचे नुकसान झाल्याने त्यांच्यापुढे या आकस्मित संकटामुळे दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे.

पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाल्याने यातील पक्षांना देण्यात येणारे खाद्य साहित्य, पाईपलाईन, लोखंडी जाळी, पक्षी खाद्य, ताडपत्री इ. साहित्याचे पूर्णतः नुकसान झाले. बाळू कचरे, पोलीस पाटील अंकुश वाजे, सखाराम वाजे, संदीप मालुंजकर, व्यंकटेश्वरा हॅचेरीज कंपनीचे स्वप्नील मोरे, हेमराज भामरे आदींनी पाहणी करत शासनाने दखल घेऊन वाजेंना मदत करण्याची मागणी केली.

अडीच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री शेडचे बांधकाम केले होते. वादळी वार्‍यासह पावसामुळे संपूर्ण पोल्ट्री शेड जमीनदोस्त झाले. त्यामुळे सुमारे १२ ते १३ लाखांचे नुकसान झाले असून, शासनाकडून भरपाई मिळाली तर कर्जफेड करता येईल.
– चंद्रकांत वाजे, शेतकरी

First Published on: June 24, 2021 10:30 AM
Exit mobile version