दुरुस्तीला आलेल्या गाड्यांची गॅरेजमध्ये बनावट चावी करत चोरी

दुरुस्तीला आलेल्या गाड्यांची गॅरेजमध्ये बनावट चावी करत चोरी

गॅरेजमधील मोटरसायकल्सची दुरुस्ती करतांनाच परस्पर त्यांच्या बनावट चाव्या तयार करायच्या आणि या गाड्या मालकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्याच घराच्या पार्किंगमधून या गाड्या लंपास करणार्‍या टोळीचा क्राईम ब्रँचच्या युनिट एकने पर्दाफाश केला. या प्रकरणात दुचाकी लंपास करणार्‍या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

न्यायालयाने दोघा संशयितांना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मोईन अन्वर खान (वय २४,नाशिक), तौफिक नसीर खान (वय २४, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दुचाकी चोरी करणार्‍या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय यांनी पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार बुधवारी (दि.२९) शहर गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना दुचाकी चोरटे सेवाकुंज, पंचवटी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी माहितीची शहानिशा करुन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथकास रवाना केले.पथकाने सापळा रचून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. दोघांनी मुंबई नाका परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पंचवटी, भद्रकाली, मुंबई नाका परिसरातून ११ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ९ दुचाकी जप्त केल्या.

अशी करायचे दुचाकी लंपास

शहरातील एकाच गॅरेजमध्ये संशयित दोन आरोपी कामाला आहेत. दोघे गॅरेजमध्ये रंगकाम आणि दुरुस्तीसाठी येणार्‍या दुचाकींची परस्पर बनावट चावी तयार करायचे. दुरुस्त झालेली गाडी दुचाकीमालक कोठे पार्क करतो, याची ते रेकी करायचे. त्यानंतर दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत दोघे बनावट चावीने दुचाकी लंपास करायचे. दोघांनी ९ दुचाकी लंपास केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यापैकी २ दुचाकी भंगारमध्ये दिल्याची कबुली दोघांनी दिली.

First Published on: October 4, 2021 9:00 AM
Exit mobile version