नाशकात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

नाशकात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली, तरी कोरानाबाधितांपेक्षा बरे होणार्‍यांचे प्रमाणही वाढत असल्याने काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे. शनिवारी प्राप्त अहवालानूसार जिल्हयात २३३८ कोरोनाबाधित आढळून आले तर २४०६ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आजमितीस जिल्ह्यात १७ हजार सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3८ हजार ५२१ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 17 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार ८०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. शनिवारी जिल्ह्यात २३३८ रुग्ण आढळून आले, यात नाशिक महापालिका हद्दीत १४५१, नाशिक ग्रामीण हद्दीत ७७१, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५९ तर जिल्हा बाह्य ५७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील दोन व्यक्तींचा सामावेश आहे. १७००० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १६८३ रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे आढळून आली आहेत, तर १५ हजार ३१७ रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. १३० रुग्ण ऑक्सिजनवर असून २६ रुग्ण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील स्थिती अशी

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 94.41 टक्के, नाशिक शहरात 94.19 टक्के, मालेगावमध्ये 95.64 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 96.50 टक्के. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.40 टक्के इतके आहे.

First Published on: January 30, 2022 8:10 AM
Exit mobile version