दसर्‍याच्या दिवशी चोरांची दिवाळी

दसर्‍याच्या दिवशी चोरांची दिवाळी

सातपूर : विजयादशमीच्या मुहूर्तावर चोरांनी दिवाळी साजरी केल्याची घटना सातपुर मध्ये घडली आहे. अशोकनगर, पवार संकुल, विश्वासनगर परिसरात चोरट्यांनी १० रिक्षाचे नवीन टायर चोरल्याची घटना गुरुवारी (दि. ६) घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली असून, तीन युवक चोरी करताना दिसून आले आहेत.

 माहितीनुसार, पवार संकुल येथे राहणारे भानुसिंग पाटील यांनी आपल्या मालकीची रिक्षा (एमएच१५ एफयु-४६६४) घरासमोर उभी केली होती.  सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा साफसफाई करण्यास गेले असता दोन्ही टायर व स्टेफनी गायब झाल्याचे दिसून आले. असाच प्रकार विश्वास नगर परिसरातील एकाच गल्लीत सात रिक्षाचे प्रत्येकी दोन चाके चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. तर, गायत्री संकुल येथे दोन रिक्षांचे नवीन टायर चोरट्यांनी विजयादशमीच्या मद्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान चोरून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, त्या आधारे वरीष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

प्रयत्न रिक्षाच चोरण्याचा

चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास रिक्षाचे हॅण्डललॉक तोडत रिक्षा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे चोरटयांनी टायर स्टेफनी कडे मोर्चा वळवत हात साफ केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. सातपुर परिसरात अनेक ठिकाणी चारचाकी व दुचाकीतुन पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या आहे. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून केली आहे.

नवीनच टायर टाकले होते साहेब…

टायर चोरीला गेलेल्या बहुतेक रिक्षा चालकांनी दसर्‍याच्या मुहूर्तावर आपल्या रिक्षाला नवीन टायर बसवले होते. मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे एकूणच आर्थिक स्थिती हालाकीची झालेली आहे. कोरोना काल संपल्यानंतर मागील काही महिन्यात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे एकूणच रिक्षा व्यवसाय मेटाकुटीला आला आहे. अश्या एकूण परिस्थितीतून जात असताना व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या रिक्षा चालकांनी ‘नवीनच टायर टाकले होते, साहेब’ अश्या शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

First Published on: October 7, 2022 1:21 PM
Exit mobile version