ऐन निवडणुकीत लाखो प्लास्टिक बाटल्यांचा वापर

ऐन निवडणुकीत लाखो प्लास्टिक बाटल्यांचा वापर

बाटलीबंद पाण्याने कार्यकर्ते तहान भागवताहेत.

नाशिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार नाशिक व दिंडोरी मतदार संघात शिगेला पोहचला आहे. त्यात सूर्य आग ओतत असल्याचे कार्यकर्त्यांना तहान भागविण्यासाठी बाटलीबंद पाणी दिले जात आहे. प्रचारात रंगत राहण्यासाठी विविध पक्षांकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दररोज सुमारे २० हजार लिटर बाटलीबंद पाणी वाटप केले जात आहे. गेल्या १५ दिवसांत प्रचार सभा आणि फेर्‍यांमध्ये लाखो पाण्याच्या बाटल्यांचा वापर झाला आहे. त्यातून प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांकडून जिल्ह्यात जोरदार सुरू झाला आहे. भरउन्हाळ्यात निवडणूक आल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांना तहान लागत आहे. त्यामुळे उमेदवार बाटलीबंद पाण्याची सोय करीत आहेत. बाटलीबंद पाणी पिणे हे आज ’स्टेटस सिम्बॉल’ बनले आहे. एका दिवसाला सुमारे २० हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. तो सर्व खर्च उमेदवार करीत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ७० लाख रूपयांची मर्यादा ठरवून दिली आहे. प्रत्यक्षात पाण्यावर रोज हजारो रूपये खर्च होत असल्याने उमेदवारांना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेत खर्च करणे कठीण जात आहे. निवडणूक आयोगही चाणाक्ष झाला असून उमेदवारांच्या प्रत्येक खर्चावर लक्ष ठेवत आहेत. मर्यादेपेक्षा खर्च अधिक झाल्यास उमेदवारांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

पाणी पिऊन झाल्यानंतर या बाटल्या अनेकांकडून फेकून दिल्या जात आहेत. त्या पाण्यांच्या स्रोतात, रस्त्यांमध्ये पडून असतात. प्लास्टिकच्या कचर्‍यामध्ये या बाटल्यांच्या कचर्‍याचे प्रमाण मोठे आहे. ज्या कंपन्या बाटलीबंद पाणी पुरवतात त्या जाहिरांतीमध्ये तसेच इतर कोणत्याही माध्यमातून बाटल्यांची विल्हेवाट कशी लावायची, हे सांगत नाहीत. त्यामुळे प्लास्टिकच्या इतर कचर्‍यासोबत या बाटल्यांमुळे तयार होणार्‍या कचर्‍याचे काय करायचे, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बाटलीबंद पाण्यामध्ये अनेकदा प्लास्टिकचे काही कण राहण्याची शक्यता आसते. त्यामुळे आरोग्याला धोकाही निर्माण होऊ शकतो. हे पाणी भरउन्हात बराच काळ राहिल्यानंतर त्यामध्ये शेवाळे किंवा बुरशी वाढू शकते, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

पाणी विक्रीत वाढ

लोकसभा निवडणूक प्रचार भरउन्हाळ्यात असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. आमच्याकडे प्रचारातील कार्यकर्त्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याच्या ५०० बाटल्या व जार वाटप केले जात आहे. त्यातून व्यवसायाला भरभराटी आली आहे. – यश जोशी, वितरक, मिनरल वॉटर बॉटल्स

First Published on: April 21, 2019 11:29 PM
Exit mobile version